सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील प्रस्तावित खनिज प्रकल्प वाचवण्यासाठी उप वनसंरक्षकांचे खोटे प्रतिज्ञापत्र !
|
सावंतवाडी : सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील ‘वाईल्ड लाईफ कॉरिडोर’विषयी मुंबई उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याच्या विरोधात आव्हान याचिका प्रविष्ट करणार आहोत. रेड्डी यांनी केवळ खनिज क्षेत्र (प्रकल्प) वाचवण्यासाठी सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे; मात्र त्यांचा हा निर्णय हाणून पाडू. वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर अन् असनिये गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांनी केला आहे.
याविषयी डॉ. परूळेकर यांनी सांगितले की,
१. सावंतवाडी आणि दोडामार्ग येथील प्रस्तावित ४९ खनिज प्रकल्प वाचवण्यासाठी त्यांनी दबावापोटी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांतील भाग पश्चिम घाट संवर्धन क्षेत्रात येतो.
२. सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ समितीने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांचा समावेश ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मध्ये (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागामध्ये) केला होता. त्यानंतर कस्तुरीरंगन समितीने दोडामार्ग तालुका ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मधून वगळला.
३. वनशक्ती फाऊंडेशनने आंबोली ते मांगेलीपर्यंतचा पट्टा ‘वाईल्ड लाईफ कॉरिडोर’ असल्याने ‘इको सेन्सिटीव्ह झोन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात वर्ष २०१३ मध्ये प्रविष्ट केली होती.
४. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील २५ गावांच्या ग्रामसभेत ही गावे ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मध्ये समाविष्ट करावीत, असा ठराव घेतला होता. यामुळे प्रस्तावित खनिज प्रकल्पांना चपराक बसली होती. वर्ष २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने याचिकेच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोड बंदी लागू केली होती.
५. यापूर्वीचे उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे, तसेच कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक यांनी ‘इको सेन्सिटीव्ह झोन’विषयी सकारात्मक भूमिका घेतली होती; मात्र या भागात पुन्हा खाण प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न होत आहे.