चित्रपटसृष्टीचा ‘काळा’ चेहरा !
काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) सट्टा लावून कोट्यवधी रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण करणार्या ‘महादेव अॅप्लिकेशन’शी संबंधित देशभरात रायपूर, भोपाळ, मुंबई यांसह ३९ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यांत ४ जणांना अटक करण्यात आली आणि ४१७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या सगळ्याचे आणखी खोलात जाऊन ईडीने जेव्हा अन्वेषण चालू केले, तेव्हा यंत्रणेच्या असे लक्षात आले की, अनेक प्रथितयश हे ‘महादेव अॅप्लिकेशन’ आणि त्याच्याशी संबंधित सट्टा यांचे विज्ञापन करतात. याच्या बदल्यात त्यांना मिळणारा पैसा हा ‘ऑनलाईन’ सट्टेबाजीच्या अवैध कमाईतून मिळतो.
याचा थेट संबंध दुबईस्थित ‘महादेव अॅप्लिकेशन’चा संस्थापक आणि कुख्यात सट्टेबाज सौरभ चंद्राकरशी आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने ‘महादेव अॅप्लिकेशन’शी संबंधित विज्ञापन केल्याच्या कारणावरून आणि त्याच्याशी संबंधित सर्वच गोष्टींची माहिती घेण्यासाठी ६ ऑक्टोबरला ईडीच्या कार्यालयात बोलावले आहे. केवळ अभिनेता रणबीर कपूरच नाही, तर अश्लील चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री (?) सनी लिओनी आणि १७ अशी नावे पुढे आली की, जी ‘महादेव अॅप्लिकेशन’शी संबंधित आस्थापनांचे विज्ञापन करतात. ‘महादेव अॅप्लिकेशन’शी संबंधित अनेक प्रसिद्ध लोकांची नावे ‘ईडी’च्या संभाव्य सूचीत असल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
सट्टेबाज सौरभ चंद्राकरने त्याच्या दुबई येथे झालेल्या विवाहासाठी २०० कोटी रुपयांचा व्यय केला. या विवाहासाठी त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि विवाहात नाचण्यासाठी अभिनेते, अभिनेत्री, गायक यांना नागपूर येथून खासगी विमानाने दुबईत नेले होते. यासह विवाहासाठी मुंबईतून नाचणारे, तसेच अन्य कामे करणार्या लोकांनाही खासगी विमानाने बोलावले होते. यात ‘योगेश’ नावाच्या व्यक्तीने एका आस्थापनाच्या आडून ‘हवाला’च्या (कोणताही हिशोब नसणारी पैशाचा देव-घेव करणारी यंत्रणा) माध्यमातून ११२ कोटी रुपये रोख दिल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. या संदर्भात अन्वेषण यंत्रणांचे असे म्हणणे आहे की ‘महादेव अॅप्लिकेशन’च्या प्रसिद्धीसाठी अभिनेते किंवा अभिनेत्री यांना देण्यात आलेले पैसे हे सट्ट्याच्या माध्यमातून गैरमार्गाने गोळा करण्यात आलेले आहेत. ज्यांना हे पैसे देण्यात आले, त्यात रणबीर कपूर आघाडीवर आहे, असा आरोप आहे. या घोटाळ्याची रक्कम ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बॉलीवूड आणि गुन्हेगारी !
बॉलीवूड आणि गुन्हेगारी यांचा संबंध पुष्कळ पूर्वीपासून म्हणजे १९८० च्या दशकापासून आहे. मुंबई बाँबस्फोट खटल्यातील पसार कुख्यात आतंकवादी दाऊदचे वर्चस्व चित्रपटसृष्टीवर आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते ‘हवाला’च्या माध्यमातून पैसा घेऊन तो चित्रपटांवर लावतात. या संदर्भातील सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे अभिनेता संजय दत्तचे आहे. ज्याला एकेकाळी तरुणांनी ‘स्टार’ म्हणून डोक्यावर घेतले, त्या संजय दत्तला वर्ष १९९२ मध्ये झालेल्या मुंबईत साखळी बाँबस्फोट खटल्यात अवैध शस्त्रे ठेवल्याच्या प्रकरणी अनेक वर्षे कारागृहाची हवा खावी लागली ! जे हिंदू धार्मिक असतात, ते मद्यपान, तसेच अन्य व्यसनांपासून लांब असतात. त्यामुळे ‘असे हिंदू जाणीवपूर्वक हिंदु धर्मापासून लांब कसे जातील ?’, यांसाठी ‘ड्रग्ज माफिया’ आणि अन्य लोकांची एक मोठी टोळी कार्यरत आहे. या लोकांना दाऊदसारख्या लोकांकडून पैसा येतो. ही टोळी धर्मावर आघात करणारा एक प्रवाह सिद्ध करत आहे.
‘ईडी’ची नोटीस आलेला हा रणबीर कपूर पहिलाच अभिनेता नसून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याच्या ‘लायगर’ नावाच्या चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि सहनिर्माती चार्मी कौर यांच्यावरही या चित्रपटात काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांचे अन्वेषण झाल्याचे वृत्त आले आहे.
जुगाराचे विज्ञापन करणारे आदर्श कसे ?
ज्यांच्याकडे समाज आज आदर्श म्हणून पहातो, विशेष करून जे अभिनेते असतात, तेच सट्टा लावणारे विविध ‘अॅप’, मद्यविक्री करणारी आस्थापने, गुटखा, पान मसाला, सिगारेट अशा समाजाला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणार्या वस्तू किंवा ‘अॅप’ यांचे विज्ञापन अगदी हिरीरीने करतात. सध्या ‘ऑनलाईन’ सट्टा मोठ्या प्रमाणात चालतो. यात ‘महादेव अॅप्लिकेशन’ हे अत्यंत कुप्रसिद्ध असून याचा संबंध शत्रूराष्ट्र पाकिस्तानशीही आहे. ‘सट्टा’ लावणे हा असा खेळ आहे की, ज्याच्या व्यसनामुळे मनुष्याचे आयुष्य उद़्ध्वस्त होते. ज्या व्यसनांमुळे व्यक्ती आणि कुटुंब उद़्ध्वस्त होते, त्याचे विज्ञापन करून समाजाला अनैतिकतेकडे ढकलणारे, कफल्लक बनवणारे अभिनेते समाजाचे आदर्श कसे होऊ शकतील ? ज्यांना समाज काही प्रमाणात सभ्य, चांगले, राष्ट्रप्रेमी कलाकार म्हणून पहातो, असे अजय देवगण आणि अक्षय कुमार हेही अग्रक्रमाने ‘पान मसाल्या’चे विज्ञापन करून विविध ठिकाणी झळकतात. दुर्दैवाने यात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मागे नाहीत.
जे कलाकार, अभिनेते चित्रपटात सोज्वळ असल्याचा, आदर्श असल्याचा आव आणणात आणि प्रत्यक्षात जुगाराचे विज्ञापन करतात, त्यांची अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी होते. अशांच्या चित्रपटांवर नागरिकांना बहिष्कार घालण्यास पुढाकार घ्यावा लागेल. शासन पातळीवरही परीनिरीक्षण मंडळाने गुन्हेगारीशी, काळ्या पैशांशी संबंधित अभिनेत्यांच्या चित्रपटांना संमती न देण्यासारखे कठोर निर्णय घ्यावेत. असे केले, तरच अशा अपप्रकारांना काही प्रमाणात पायबंद बसण्यास साहाय्य होईल !