५ नोव्हेंबर या दिवशी राज्यातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका !
मुंबई – महाराष्ट्रातील २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबर या दिवशी होणार आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी केली. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे. (नक्षलवादामुळे निवडणुका लवकर आटोपाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे चाललेल्या या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार ? साम्यवादपुरस्कर नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी ! – संपादक) सार्वत्रिक निवडणुकीसह २ सहस्र ९५० ग्रामपंचायत सदस्य आणि १३० सरपंच या पदांचीही पोटनिवडणूक ५ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देणे, २३ ऑक्टोबर या दिवशी नामनिर्देशनपत्रांची पडताळणी, २५ ऑक्टोबर या दिवशी अर्ज मागे घेणे आणि निवडणूक चिन्हांचे वाटप असे नियोजन आहे, अशी माहिती आयुक्त यू.पी.एस्. मदान यांनी दिली.