नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत २४ घंट्यांत २५ रुग्णांचा मृत्यू नाही ! – डॉ. सागर पांडे, वैद्यकीय अधीक्षक
नागपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ घंट्यांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात संताप व्यक्त झाला. त्यातच आता नागपूर येथील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतही २४ घंट्यांत २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत; मात्र वस्तूस्थिती अशी नाही. मेयो आणि मेडिकल या दोन्ही रुग्णालयांत अत्यवस्थ अन् ‘व्हेंटिलेटर’वरील रुग्णांचे दिवसाला ५-६ मृत्यू होत आहेत, अशी माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली.
विदर्भासह ३ राज्यांतील रुग्णांचा भार !
डॉ. पांडे म्हणाले की, मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांतील अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकल रुग्णालयात १ सहस्र ४०१ अधिकृत, तर ट्रॉमा आणि अतिरिक्त मिळून एकूण अनुमाने १ सहस्र ८०० खाटा आहेत. मेयो रुग्णालयात ८२२ खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत प्रतिदिन अनुमाने दीड सहस्र रुग्ण भरती होऊन उपचार घेतात. खासगी रुग्णालये त्यांच्याकडील विषप्राशन, हृदयविकार, आत्महत्येचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न अशा प्रकरणांतील रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयांत येतात. जगण्याची शक्यताही अल्प असते. शर्थीच्या प्रयत्नानंतरही हे रुग्ण दगावतात. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या निरीक्षणानुसार १ सहस्र खाटांमध्ये ६ ते ८ मृत्यू होणे सामान्य आहे.
३ मास पुरेल इतका औषधसाठा !
येथील दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषधे रुग्णांना बाहेरून आणण्यास सांगितले जात असले, तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या तुलनेत येथे औषधांचा ३ मास पुरेल एवढा साठा आहे. सर्पदंशासाठी आवश्यक इंजेक्शनसह इतर औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.