छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून या वर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर !

मालवण : डिसेंबर मासात सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘नौसेना दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता येथील ‘राजकोट’ या किल्ल्यावर उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची या निमित्ताने पुनर्बांधणी होणार आहे. शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी येथील ‘हॉटेल ऐश्वर्य’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

पत्रकार परिषदेत संबोधित करतांना पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर (मध्यभागी)
(चित्र सौजन्य : सिंधुदुर्ग 24 तास)
(चित्रावर क्लिक करा)

या वेळी अवि सामंत, रवींद्र खानविलकर, मंगेश जावकर, सहदेव बापर्डेकर, भूषण साटम, सुरेश बापर्डेकर, अभय पाटकर, सहदेव साळगावकर, शेखर गाड, दर्शन वेंगुर्लेकर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(सौजन्य : VikasChaudhariVlogs)

या वेळी मोंडकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केल्यानंतर त्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता. आता ढासळत चाललेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची ३५० वर्षांनंतर पुनर्बांधणी, तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने हा क्षण समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.’’