प्रगत आणि अप्रगत म्हणजे काय ?
काही बुद्धीवादी लोक म्हणतात की, समाजाच्या अप्रगत अवस्थेत वेद निर्माण झाले, ज्यात जारणमारण वगैरे यातुविद्या आहे; पण हे खोटे आहे. समाज जेव्हा पूर्णावस्थेला, प्रगतीला पोचलेला असतो, तेव्हा त्यात अप्रगत अवस्थांपासून प्रगत अवस्थेपर्यंत सर्व स्तर असतात. आजच्या समाजात विमाने आहेत, तसेच बैलगाडीही आहे. सहस्रो वर्षांनंतर उत्खननात विमान आणि बैलगाडीचे अवशेष सापडले, तर असा निष्कर्ष काढणार
का ? की, ज्या अर्थी इथे बैलगाडीचे अवशेष सापडले, त्या अर्थी २० व्या शतकातसुद्धा समाज अप्रगत होता. जेथे विमानाचे अवशेष सापडले, तेथील संस्कृती नंतरची आणि प्रगत आहे, हे जसे चुकीचे आहे, तसे वेदांत यातुविद्या आणि जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानही आहे. शनिमाहात्म्य आणि अमृतानुभव यांची तुलना केली, तर शनिमाहात्म्यापेक्षा अमृतानुभव जुना आहे अन् शनिमाहात्म्याची रचना अलीकडची आहे. मग यात प्रगत काय ? याप्रमाणे वेद, उपनिषदे यांचे तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ तर आहेच; पण ते सर्वांत प्राचीन आहे. जुने म्हणजे अप्रगत, नवे म्हणजे प्रगत ही विचारधाराच अशास्त्रीय आहे.
– स्वामी वरदानंद भारती