‘डीजे लेझर शो’चे घातक दुष्परिणाम जाणून त्याच्यावर बंदी आणा !
(टीप : ‘डीजे लेझर शो, म्हणजे डिस्क जॉकी’ यामध्ये एक व्यक्ती वेगवेगळ्या संगीतांचे मिश्रण करून त्याचे प्रसारण करते. ‘लेझर’ हे असे उपकरण आहे की, जे प्रकाशाची तीव्रता एका विशिष्ट दिशेने केंद्रित करून वाढवते. लेझर केवळ प्रकाशाची तीव्रता वाढवत नाहीत, तर प्रकाश निर्माण करतात आणि तो उत्सर्जित करतात, ज्यामुळे किरणोत्सर्गाची तीव्रता वाढते. हा प्रकाश संगीतावर इतरत्र प्रसारित केला जातो.)
नुकतीच अनंत चतुर्दशी आनंदात पार पडली. ढोल, ताशा आणि आता ‘डीजे’च्या गजरात अनेकांनी नाचत गणपति बाप्पाला निरोप दिला ! दुसर्याच दिवशी मी नेहमीप्रमाणे बाह्य रुग्ण विभागामध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्याच वेळात एक २० वर्षांचा तरुण ‘काल (२८ सप्टेंबर या दिवशी) अचानक न्यून दिसायला लागले’, म्हणून आला. प्राथमिक पडताळणी करून बघितले, तर त्याची दृष्टी पुष्कळच न्यून झाली होती. मग डोळ्यांचे ‘प्रेशर’ (दाब) घेऊन त्याला नेत्रपटल पडताळणीसाठी घेतले. बघतो तर काय, त्याच्या नेत्रपटलावर पुष्कळ रक्त मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गोठले होते आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. |
१. ‘डिजे लेझर शो’मुळे डोळ्यांचा पडदा जळण्याच्या घटना उघडकीस येणे
हा आजार नेहमीप्रमाणे वाटणारा नव्हता, याची मला जाणीव झाली. मग मी पुनर्पडताळणीत त्याला विचारले की, काही मार लागला होता का ? किंवा तू काही ग्रहण वगैरे बघितले होते का ? कि कुठे वेल्डिंग बघितले ? तर त्याने यातील काहीच केलेले नव्हते. खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितले की, काल मिरवणुकीत नाचलो आणि ‘डीजे’वर ‘लेझर शो’ बघितला. मग मनात पाल चुकचुकली आणि ‘लेझर शो’चा ‘लेझर बर्न रेटिना’ (‘लेझर शो’मुळे डोळ्यांचा पडदा जळणे) असल्याची निश्चिती झाली. मग रेटिनाचा ‘ऑप्टिकल कोहेरेंस टोमोग्राफी’ (ओसीटी – नेत्रतपासणीचे एक आधुनिक तंत्रज्ञान) स्कॅन करून माझ्या निदानाची निश्चिती केली. पुढील २ घंट्यांमध्ये आणखी २ रुग्ण आले आणि त्यांच्या डोळ्यांच्या पडद्यांवरही याच प्रकारचे चित्र दिसले. यानंतर मी आमच्या नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून २ रुग्णालयांमध्ये असेच रुग्ण आहेत, असे निदर्शनास आले. याचाच अर्थ ५ हून अधिक तरुण एकाच दिवशी ‘डिजे लेझर शो’चे शिकार झालेले पाहिले. यातील बरेच जण अजून कदाचित् आम्हाला कळलेले नसतील किंवा दुसर्या जिल्ह्यातही असतील. ही संख्या याहून अधिक प्रमाणात असावी. नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे ‘लेझर बर्न’ क्वचितच बघितले असावेत. हा काहीतरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृतीसाठी हा पत्रप्रपंच !
२. …बंदी न आणल्यास तरुणांचे भवितव्य अंधकारमय !
मग प्रश्न पडला की, ठराविक लोकांनाच असे का झाले ? याचा खोलवर अभ्यास केल्यावर कळाले की, या ‘ग्रीन लेझर’ची ‘फ्रिक्वेन्सी’ पुष्कळ अधिक होती अन् ज्या युवकांनी त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या ‘फोकल लेंथ’वर नेत्रपटल आले, त्यांच्या समवेत हे प्रकार घडले. आपण लहानपणी भिंग घेऊन उन्हात कागद पेटवायचो, तसाच प्रकार या लेझरने या तरुणांवर केला होता. अशा प्रकारच्या लेझर वापरावर बंदी आणण्याची आवश्यकता आहे.
अन्यथा याचे भयंकर परिणाम नवरात्र आणि दिवाळी यांमध्ये दिसतील अन् कित्येक निष्पाप लोकांची दृष्टी यात जाईल. दिखाऊपणासाठी वापरण्यात येणार्या ‘डिजे लेझर’चा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल, याची यत्किंचित कल्पनाही करवत नाही. या सगळ्या तरुण-तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या पुढील भविष्यासाठी किती भयावह असेल ? यातील बरीच मंडळी उच्च शिक्षण घेणारी होती. प्रशासनाने वेळीच याची नोंद घ्यावी आणि हा प्रकार थांबवावा. नाहीतर अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल. (खरेतर प्रशासनाने ‘डीजे लेझर शो’च्या वापरावर स्वतःहून बंदी घालायला हवी. त्यासाठी प्रशासनाने रुग्णसंख्या वाढण्याची आणि ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्याच्या मागणीची वाट कशाला पहावी ? कुणी मागणी केल्यावर ‘डीजे लेझर शो’वर बंदी घालण्यापेक्षा दुष्परिणाम जाणून त्यावर स्वतःहून बंदी घालणारे प्रशासन हवे ! – संपादक)
– लेखक : डॉ. गणेश भामरे (‘रेटिना’ विशेषज्ञ) आणि डॉ. सचिन कासलीवाल (नेत्ररोगतज्ञ)
(साभार : नाशिक नेत्ररोगतज्ञ संघटना)