८ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे ‘महाआरोग्य शिबिर’ !
कोल्हापूर – धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ‘रिजन ट्रस्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ८ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ताराराणी विद्यापीठ, व्ही.टी. पाटील हॉल, राजाराम रस्ता येथे होईल, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी साहाय्यक धर्मादाय आयुक्त शिवराज नाईकवाडे, अधीक्षक विशाल क्षीरसागर, निरीक्षक महादेव जावळे, तसेच अन्य उपस्थित होते.
१. या शिबिरामध्ये नेत्ररोग, दंतविकार, त्वचारोग यांसह कान-नाक-घसा, तसेच अन्य विभागांच्या सेवा विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. शिबिरामध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील १८ रुग्णालये, सांगलीतील २२, रत्नागिरी ५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ रुग्णालये सहभागी होणार आहेत.
२. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग येथील गरीब अन् दुर्बल घटकातील लोकांनी महागड्या उपचारांसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात दूर न जाता कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्येच त्यांना विविध प्रकारच्या रुग्ण सेवा उपलब्ध करून दिल्या जातात, हे सांगणे हा या शिबिराचा उद्देश आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पुढील टप्प्यात जिल्ह्या-जिल्ह्यांत शिबिरे घेण्याचा मानस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये कागदपत्रांसाठी रुग्णांची अडवणूक करत नाहीत, तर तात्काळ रुग्णांवर उपचार चालू करतात, ही चांगली गोष्ट कोल्हापूर येथे पहायला मिळाली.
३. या शिबिरासाठी २५० हून अधिक स्वयंसेवक उपलब्ध आहेत. या शिबिरात ४०० ते ४५० आधुनिक वैद्यांचे पथक ८ ते १० सहस्र रुग्णांना एकाच छताखाली पडताळणी करतील. तरी या महाआरोग्य शिबिराचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
४. याप्रसंगी शिवराज नाइकवाडे म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये तेथे मिळणार्या आरोग्य सुविधांचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येक आठवड्याला आमचे निरीक्षक धर्मादाय रुग्णालयांची पहाणी करतात. सध्या या संदर्भात असलेल्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील उपलब्ध खाटा, तसेच अन्य सर्व माहिती उपलब्ध आहे. लवकरच या संदर्भातील ‘अॅप’ही चालू करण्यात येणार असून भ्रमणभाषवर बसल्याजागी सर्व माहिती मिळू शकणार आहे.’’
धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन आणि दुर्बल रुग्णांवर उपचार करण्यास कसूर केल्यास धर्मादाय सहआयुक्त, वसंत प्लाझा, दुसरा-तिसरा मजला, राजाराम रस्ता, बागल चौक येथे लेखी तक्रार प्रविष्ट करावी, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. |