कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकार्याला १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !
कोल्हापूर – कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. साखरे यांनी क्रीडा साहित्य पुरवठा ठेकेदारास त्याचे देयक देण्यासाठी ही लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे आणि त्यांचे पथक यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ‘ऑनलाईन महाटेंडर’वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य संकेतस्थळावर आलेल्या विज्ञापनानुसार पुरवले होते. त्यानुसार ठेकेदाराने पुरवलेल्या ८ लाख ८९ सहस्र रुपयांचे देयक संमत करण्यापोटी १५ टक्के रकमेची मागणी केली होती. शेवटी तडजोडीवर १ लाख १० सहस्र रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने नोंदवलेल्या तक्रारीनुसार चंद्रशेखर साखरे यांना लाचलुचपत पथकाने रंगेहात लाच घेतांना पकडले. साखरे यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
संपादकीय भूमिका :भ्रष्टाचारग्रस्त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरीला आळा बसणार नाही ! |