नागपूर येथील सुपारी व्यापार्याचे अपहरण करून अमानुष छळ !
५ मासांनंतर घटना उघड
नागपूर – शहरातील सुपारी व्यापारी नानक सुहाराणी यांचे अपहरण करून त्यांचा अमानुष छळ करण्यात आल्याची घटना ५ मासांनी समोर आली आहे. आरोपींनी त्यांना बंदी बनवून त्याच्या सर्वांगावर सिगारेटचे चटके दिले आहेत.
सुहाराणी यांनी काही व्यापार्यांना पैसे उधार दिले होते, तसेच काही हवाला आणि सुपारी व्यापार्यांकडून पैसे उधारही घेतले होते. २० मे २०२३ या दिवशी नानक सुपारीचे पैसे आणण्यासाठी नागपूर येथून गुजरात येथे निघाले. त्यानंतर ५ मास उलटूनही ते घरी परतले नाही. ते बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात दिली होती. अपहरणकर्त्यांनी नानक यांना नंदुरबार येथे लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्याच्या तावडीतून कसेबसे सुटले. त्यांनी थेट नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांनी सर्व माहिती दिली. नानक यांच्या पत्नीने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या घटनेमागे हात असलेल्या ५ संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत.