डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी शहरांत महास्वच्छता अभियान !
|
अहिल्यानगर – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यानगर शहरासह राहुरी आणि कर्जत येथे नुकतेच सकाळी ८ ते ११ या वेळेत महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यात महाविद्यालयाचे युवक, महानगरपालिका कर्मचारी, विविध संस्थांच्या पदाधिकार्यांसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांसह ८०० जणांनी २० टन कचर्याची विल्हेवाट लावली.
अहिल्यानगर शहरातील ३ नंबरच्या पुणे बस स्थानकापासून महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे कुदळ, खोरे, घमेले, खराटे यांसारखी उपकरणे हातात घेऊन श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीसदस्यांच्या हातात असलेला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा कापडी फलक, मास्क आणि हँडग्लोज घातलेले श्रीसदस्य या अभियानाचे आकर्षण ठरले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि राहुरी या तालुक्याच्या ठिकाणीही स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात राहुरी येथे ९० श्रीसदस्यांनी साडे नऊ टन, तर कर्जत येथे १३० श्रीसदस्यांनी ४ टन कचर्याची विल्हेवाट लावून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.