छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर आपल्याला रामराज्यात करायचे आहे ! – अभय जगताप
चिपळूणमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित शिवशौर्य यात्रेचे जल्लोषात स्वागत
चिपळूण, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – आजचा दिवस दसरा-दिवाळीसारखा उत्साहाचा दिसतो, ही किमया छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आजपर्यंत देशावर अनेक आक्रमणे झाली. परकीय आक्रमकांना केवळ देशच लुटायचा नव्हता; तर देशातील धर्म, संस्कृती आणि धर्मनिष्ठ समाजजीवन नष्ट करायचे होते. त्यांनी आपली मंदिरे लुटली, मूर्ती फोडून त्यांच्या भग्न अवशेषातून शौचालये बांधली. सीतामातेच्या शील रक्षणासाठी रामायण घडले. द्रौपदीच्या शील रक्षणासाठी महाभारत घडले. आज देशात माता भगिनींवर ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अत्याचार होत आहेत. जेथे गोमातेचे पूजन होते, त्या रस्त्यावर गोमातेच्या रक्ताचे पाट वाहत आहेत. आमचा त्यागाचा, बलीदानाचा, पराक्रमाचा इतिहास आहे. राष्ट्र, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी शिवप्रभूंकडून प्रेरणा घेण्यासाठी आपण जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, आपल्याला त्याचे रूपांतर रामराज्यात करायचे आहे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, रायगडचे सदस्य श्री. अभय जगताप यांनी केले. शिवशौर्य यात्रेच्या वेळी येथील श्री सुकाई मंदिर, पालघर आणि श्री जुना कालभैरव मंदिर परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते.
शिवशौर्य यात्रेचे सोमवार, २ ऑक्टोबरच्या सायंकाळी तालुक्यात सावर्डे येथे स्वागत झाले. त्यानंतर शहरातील पाग नाका येथे तिचे आगमन झाले. या वेळी सुकाई देवस्थान, पाग परिसरातील देवस्थाने आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी यात्रेचे स्वागत केले. सुकाई मंदिरात स्वागत सभा झाल्यानंतर यात्रा चिंचनाका मार्गे श्री जुना कालभैरव मंदिर परिसरात येतांना मार्गावर नागरिकांनी रथाचे स्वागत आणि पुष्पवृष्टी केली. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा भगवामय घोषणा देण्यात आल्या. या यात्रेच्या वेळी हिंदुत्वजागरणासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या मंडळींचा सत्कार करण्यात आला.
यात्रेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ !
यात्रेत विहिंपचे जिल्हा मंत्री श्री. उदय चितळे, विहिंप कार्यालय प्रमुख प्रमोद पटवर्धन, पराग ओक, भाजप तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर अध्यक्ष श्रीराम शिंदे, बजरंग दल जिल्हा संयोजक अधिवक्ता आदित्य भावे, श्री सुकाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. शंकर चव्हाण, श्री कृष्णेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. सुमेध करमरकर, जुना कालभैरव मंदिराचे विश्वस्त श्री. समीर शेट्ये, श्री. पंकज कोळवणकर, उघडा मारुती मंदिर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद ठसाळे, श्री सुकाई देवस्थानचे श्री. भाऊ खेडेकर, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, माजी नगरसेवक सर्वश्री विकी नरळकर, आशिष खातू, विजय चितळे, माजी नगरसेविका सौ. सई चव्हाण, सौ. रसिका देवळेकर, सौ. सीमा रानडे, युवा कार्यकर्ते सर्वश्री सुयोग चव्हाण, संदेश किंजळकर, स्वानंद रानडे, मंदार कदम, संदीपराव कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, श्री. हेमंत चाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.