नांदेड प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
शासकीय रुग्णालयात २४ घंट्यांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण !
कोल्हापूर – मी वैद्यकीय आयुक्त आणि संचालक यांना कालच नांदेड येथे पाठवले आहे. या घटनेच्या अन्वेषणासाठी समिती नेमण्यात येणार आहे. नांदेड येथे झालेले २४ मृत्यू आणि आणखी ७ मृत्यू यांची माहिती मला मिळाली आहे. यातील प्रत्येक मृत्यू पावलेल्याचे अन्वेषण केले जाईल, तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
नांदेड शासकीय रुग्णालय प्रकरण: चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार: मुख्यमंत्री शिंदे: @mieknathshinde #MahaMTB #EknathShinde #nandedgovermenthospitalhttps://t.co/9fTBpoHH2F
— महा MTB (@TheMahaMTB) October 3, 2023
वैद्यकीय शिक्षणमंत्री पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात प्रतिदिन २ सहस्र रुग्ण येतात, तर नांदडेमध्ये १ सहस्र ५०० हून अधिक संख्या असते. या प्रकरणी अद्याप मी पूर्ण माहिती घेतलेली नाही, ती घेऊन बोलेन. शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण हे अत्यवस्थ असतात. अपघातातील घायाळ रुग्णही शासकीय रुग्णालयात येतात. खासगी रुग्णालयात देयक अधिक येते; म्हणूनही अनेक रुग्ण इकडे येतात. या प्रकरणी जर आधुनिक वैद्यांचा हलगर्जीपणा असेल, औषधे नसतील, तर आम्ही निश्चित कारवाई करू’’ (यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्यावर सरकार अन्वेषणाचे आदेश देते, अन्वेषण समित्या नेमल्या जातात; मात्र त्यांचे पुढे काय झाले ? किती जणांवर कारवाई झाली ? हे कधीच समोर येत नाही. शासकीय रुग्णालयांनी त्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी झालेल्या प्रकरणी त्वरित वस्तूनिष्ठ माहिती जनतेसमोर मांडली पाहिजे. सरकारने अशा प्रकरणांमध्ये दोष निश्चिती करून त्वरित कारवाई केल्यास जनतेचा सरकारवरील विश्वासही टिकून राहील ! – संपादक)