रत्नागिरी येथील आहिताग्नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
‘१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्निहोत्र’ (टीप १) घेतले. त्या वेळी त्यांना आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्या अडचणी, वेळोवेळी त्यांना देवाने कुणाच्या तरी माध्यमातून केलेले साहाय्य आणि ‘श्रौत अग्निहोत्र’ घेतल्यावर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. १ आणि २ ऑक्टोबरच्या अंकात आपण ‘श्रौत अग्निहोत्र घेण्यापूर्वी (व्रत अंगीकारण्यापूर्वी) आणि श्रौत घेतांना (अंगीकारतांना) आलेल्या अनुभूती, तसेच झालेले त्रास’ ही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
टीप १ – श्रौत अग्निहोत्र : श्रुतींमध्ये म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या ३ अग्नींच्या साहाय्याने करावयाच्या यज्ञांच्या स्वरूपातील ‘धर्म’ म्हणजे ‘अग्निउपासना’.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/724658.html
६. अग्निहोत्र घेतांना (व्रत अंगीकारतांना) आलेल्या अनुभूती
६ अ. अग्नीच्या ज्वाळा मोठ्या असूनही त्यांची धग न जाणवता थंडावा जाणवणे : अग्निहोत्र घेतांना (अंगीकारतांना) प्रथम त्या ठिकाणी आम्ही स्मार्ताग्नीची स्थापना केली. त्या वेळी अग्नीला आवाहन केले. तेव्हा ‘तेथे अग्निनारायण उपस्थित आहेत’, असे जाणवत होते. अग्नीच्या ज्वाळा मोठ्या होत्या; परंतु त्यांची धग न जाणवता थंडावा जाणवत होता.
६ आ. शरिरात एकप्रकारे ऊर्जा आणि शक्ती आल्याचे जाणवत होते.
६ इ. अग्निहोत्र घेण्यासाठीच्या विधींना आरंभ झाल्यावर शरिराला हलकेपणा जाणवत होता. ‘मी एका वेगळ्याच वातावरणात आहे’, असे वाटत होते.
६ ई. पुरोहितांनी केलेले कौतुक : या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पुरोहित हे या क्षेत्रातील मोठे ज्ञानी आणि अनुभवी होते, तरीही ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुमच्यामुळे आम्हाला विधी बघण्याची आणि करण्याची संधी मिळाली. सध्याच्या काळात असा योग येणे दुर्मिळ आहे. तुमच्यामुळे हे कार्य आता आणखी पुढे जाईल.’’
६ उ. आहिताग्नी वेदमूर्ती चैतन्य काळेगुरुजी यांनी अरणीमंथा देणे : कार्यक्रमासाठी आलेले आहिताग्नी वेदमूर्ती चैतन्य काळेगुरुजी यांनी त्यांनी बार्शीहून आणलेला अरणीमंथा (टीप ४) आम्हाला दिला. त्यांनी कार्याला आरंभ करण्यापूर्वी ‘तुम्ही गुरूंना सांगितलेत ना ?’, अशी आमच्याकडून निश्चिती करून घेतली. त्यानंतरच सर्व विधींना आरंभ झाला.
टीप ४ : अरणीमंथा म्हणजे ज्याच्या साहाय्याने अग्नीची निर्मिती केली जाते, त्या लाकडी फळीला ‘अरणी’ आणि घुसळण्यासाठीच्या रवीसारख्या दांड्याला ‘मंथा’ असे म्हणतात.
६ ऊ. आहिताग्नी वेदमूर्ती चैतन्य काळेगुरुजी यांच्याकडे बघतांना ‘आपण एखाद्या संतांच्या सहवासात आहोत. तेच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत’, असेच सतत वाटत होते.
६ ए. रात्रभर न झोपता आणि काहीच न खाता-पिता अग्नि सतत प्रज्वलित ठेवतांना दोघांनाही काहीच त्रास न होणे : अग्निहोत्र घेण्याच्या (व्रत अंगीकारण्याच्या) कार्यात एक विधी आहे ज्याला ‘व्रत धारण करणे’, असे म्हणतात. त्यात आम्हाला (यजमान पती-पत्नींना) रात्रभर न झोपता अग्नी सतत प्रज्वलित ठेवायचा असतो. तसेच त्याचा आरंभ झाल्यापासून, म्हणजे साधारण आदल्या दिवशी सूर्यास्तापासून ते दुसर्या दिवशी सूर्योदयानंतरही काही वेळ आम्ही काहीच खायचे-प्यायचे नसते. ‘अगदीच वाटले, तर पाणी पिऊ शकता’, असे आम्हाला सांगितले होते. या काळात देवाच्या कृपेने आम्हा दोघांनाही काहीच त्रास झाला नाही. सर्व काही व्यवस्थित झाले.
६ ऐ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विधीला प्रत्यक्ष नसतांनाही त्यांनी ‘पूर्णाहुती पुष्कळ छान झाल्यासारखे वाटते’, असे सांगणे : कार्यक्रमाची सांगता (शेवट) पूर्णाहुतीने झाली. त्या वेळी अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा श्री. केतन यांना भ्रमणभाष आला, ‘आता पूर्णाहुती झाली का ? मला येथे पूर्णाहुती पुष्कळ छान झाल्यासारखे वाटत आहे.’ प्रत्यक्षातही ‘पूर्णाहुती पुष्कळ चांगल्या प्रकारे झाली’, असे तेथे उपस्थित सर्वांनाच जाणवत होते.
७. अग्निहोत्र घेतल्यावर (अंगीकारल्यावर)
अ. अग्निहोत्र घेतल्यावर (अंगीकारल्यावर) १२ दिवस तीनही कुंडांत अग्नी सतत चालू ठेवायचा असतो. ही तशी थोडी कठीण गोष्ट होती; पण देवाच्या कृपेने हे कार्यही व्यवस्थित पार पडले. या कालावधीत अनेक वेळा ‘अग्निदेवच आम्हाला इंधन घालायची आठवण करून देत आहेत’, असे अनेकदा जाणवले.
(अग्नीची ३ कुंडे असतात. त्यांची नावे पुढील प्रमाणे गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नि.)
आ. एरव्ही मला नाटे येथील घरात रात्रीच्या वेळी एकटीच असतांना पुष्कळ भीती वाटते; पण या १२ दिवसांत मला भीती वाटली नाही. ‘या वेळी आपल्याजवळ सतत कुणीतरी आहे’, याची जाणीव होत होती.
इ. चेहर्यावरील आवरण उणावणे आणि वातावरणातील दाब अल्प होणे : संशोधनाच्या दृष्टीने आम्हाला होम झाल्यावर आणि होण्याआधी अशी छायाचित्रे काढण्यास सांगितले होते. तेव्हा ‘अग्निहोत्र घेतल्यापासून चेहर्यावरील आवरण उणावलेे आहे’, असे आम्हाला दोघांनाही जाणवले. होमापूर्वी जाणवणारा दाब आणि आवरण होम झाल्यानंतर अल्प झाल्यासारखे वाटलेे.
ई. अरणीमंथन करतांना आलेल्या अनुभूती
१. अग्निहोत्र घेतल्यापासून १२ दिवसांनी आम्ही रत्नागिरी येथे सध्या रहात असलेल्या घरी आलो. तेव्हा येथील कुंडात अग्नीची स्थापना करण्यासाठी अरणीमंथन केले. त्या वेळी प्रथम ते आम्हाला नीट जमत नव्हते; पण नंतर अग्नीला शरण जाऊन प्रार्थना केली आणि प्रयत्न केला. तेव्हा अरणीमंथन जमले.
२. अरणीवर अग्नी आला. तेव्हा संपूर्ण शरिरात थंडावा जाणवत होता. प्रत्यक्षात आम्ही मंथन करून पुष्कळ दमलो होतो. उन्हाळ्यामुळे पुष्कळ गरम होत होते, तरीही त्या क्षणी एखाद्या अतिथंड प्रदेशात थंड वारे वहातात, तसा थंड वारा आला. तेव्हा माझे शरीर थरथरत होते.
३. त्या वेळी ‘प्रत्यक्ष अग्निनारायण तेथे आले आहेत’, अशी जाणीव झाली.
४. गुरुपौर्णिमेच्या २ दिवस आधी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी अग्नीला प्रार्थना करत असतांना मला एक पिवळे पितांबर नेसलेली आणि सुवर्णालंकार धारण केलेली सोन्यासारखे पिवळे वलय असलेली देवता अग्नीच्या ‘आहवनीय’ या कुंडासमोर येऊन बसल्याचे जाणवले; पण त्या देवतेचा चेहरा न दिसता खांद्यापर्यंतचाच भाग दिसत होता. (मला ती देवता ‘प्रत्यक्ष अग्निनारायणच आहेत’, असे वाटले.)’
(समाप्त)
– सौ. कल्याणी केतन शहाणे, रत्नागिरी (२२.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |