वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांना आलेल्या अनुभूती !
श्री. यशवंत चौधरी, चोपडा
१. माझ्याकडून गेले ६ मास ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप आपोआप होत होता. तसेच माझ्याकडून नियमित दत्त मंदिरात जाणे होत होते.
२. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून संगणकीय प्रणालीद्वारे गुरुपौर्णिमेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हे एकच आहेत’, असे सांगितल्यावर माझा भाव जागृत झाला. तेव्हा ‘गुरुमाऊली माझ्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेत होती’, हे माझ्या लक्षात आले.’
कु. भावना कदम, नंदुरबार
१. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांसाठी सकाळी भावसोहळा होता. तो पहातांना भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. सर्व साधकांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा सामूहिक नामजप करायला सांगितल्यावर कृतज्ञता व्यक्त झाली आणि नामजप माझ्या पितरांपर्यंत पोचत असून ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा नामजप भावपूर्ण होत होता.
३. गुरुदेवांचे दत्तात्रेय भगवंताच्या रूपात दर्शन झाल्यावर ‘गुरुमाऊली आपल्या जिवाचा उद्धार करणार आहे’, असे वाटत होते. त्या वेळी कृतज्ञता व्यक्त होऊन भावजागृती होत होती. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने पुढील कविता सुचवली.
आज कृतज्ञ झालो, आम्ही गुरुमाऊली ।
आज कृतज्ञ झालो, आम्ही गुरुमाऊली ।
हा भावसोहळा अनुभवण्यास दिलात तुम्ही ॥ १ ॥
सूक्ष्मातूनी आणि स्थुलातूनी केले नियोजन आमचे ।
धन्य झालो आम्ही अनुभवला देवलोक या कलियुगी ॥ २ ॥
किती कृपाळू दयाळू सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली ।
दत्त रूपात दर्शन झाले या दिनी ॥ ३ ॥
सामूहिक नामजपाने पितरांनी दिले आशीर्वाद आम्हासी ।
कृतज्ञता व्यक्त झाली क्षणोक्षणी ॥ ४ ॥
आम्हा समवेत कुटुंबाची काळजी माऊलीस ।
शरण येऊनी भजन निघाले मुखातूनी ॥ ५ ॥
त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।
रेखिले रूप हे हृदयांतरी ॥ ६ ॥
किती जन्मांची ही पुण्याई ।
हा भावसोहळा अनुभवायला दिलात तुम्ही ॥ ७ ॥
सच्चिदानंद परब्रह्म दत्तात्रेय माऊली ।
कृतज्ञ कृतज्ञ आहोत, आम्ही तव चरणी ॥ ८ ॥
सौ. सुवर्णा साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), जळगाव
१. ‘गुरुपूजनाला आरंभ झाला, त्या वेळी पुष्कळ चैतन्य जाणवत होते.’
२. ‘मी कुठल्या तरी वेगळ्या वातावरणात आहे’, असे मला जाणवत होते आणि पुष्कळ हलके वाटत होते.
३. ‘समोर प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा नसून तेथे प्रत्यक्ष बाबाच (प.पू. भक्तराज महाराज) चौरंगावर बसलेले आहेत’, असे मला वाटत होते.
४. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या मुखमंडलावरील भाव पालटत आहेत’, असे मला दिसत होते.
५. चौरंगाजवळच्या पाटावर ताम्हणात तांदूळ आणि नारळ ठेवलेले होते. तेव्हा ‘त्या तांदुळातून पांढरे शुभ्र चैतन्याचे उंच कारंजे मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रसरत आहेत’, असे मला दिसत होते आणि माझी भावजागृती होत होती.’
सौ. प्रमिला पवार (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), ब्रह्मपूर (मध्यप्रदेश)
१. डोळ्यांचे शस्त्रकर्म करणे पुढे गेल्यामुळे गुरुपौर्णिमेची सेवा आरंभ करणे : ‘माझ्या डोळ्यांत मोतीबिंदू झाले आहेत. त्यामुळे डोळ्यांचे शस्त्रकर्म करायचे आहे; परंतु मला मधुमेह असल्यामुळे २ – ३ वैद्यांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितले, ‘‘शरिरातील साखरेचे प्रमाण न्यून झाल्यावर १ मासानंतर शस्त्रकर्म करूया.’’ म्हणजे शस्त्रकर्म गुरुपौर्णिमेनंतर होणार होते. मग मी गुरुपौर्णिमेच्या सेवेला आरंभ केला.
२. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे दाखवलेला कार्यक्रम उपनेत्र (चष्मा) न लावता पहाता आला’, याबद्दल कृतज्ञता वाटणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवणार होते. तो कार्यक्रम बघतांना मी उपनेत्र लावले होते, तरी मला ‘स्क्रीन’वरचे काही दिसत नव्हते. मी २ – ३ वेळा उपनेत्र पुसले, तरीही दिसत नव्हते. उपनेत्र न लावता पाहिले, तरी काही दिसत नव्हते. तेव्हा प्रार्थना केली आणि उपनेत्र न लावता पाहू लागले, तर गुरुकृपेने मला सर्व ठळकपणे दिसू लागले. ‘पूर्ण कार्यक्रम मी उपनेत्र न लावता पाहू शकले’, याचे मला आश्चर्य वाटले आणि गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २५.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |