महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर (जळगाव) येथे होईल ! – मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
|
असे आहे संमेलनाचे बोधचिन्ह !संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्राचार्य मिलिंद भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बोधचिन्हात जळगावसह संपूर्ण खान्देशातील (कान्हादेशातील) संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे. बोधचिन्हात लेखणी, केळीची पाने, मराठीचा ‘म’, बहिणाबाईंचे जाते, ग्रामीण भागाचे वाद्य संबळ, आदिवासी वाद्य तरपा, माता सरस्वतीचे बोधचिन्ह, सखाराम महाराज मंदिर, मंगळग्रह मंदिर यांच्या प्रतिमांचा समावेश करण्यात आला आहे. चिन्हाखाली ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ या ओळी लिहिल्या आहेत. |
जळगाव – ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. यातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला. ‘पुढच्या पिढीला आदर्श ठरेल असे देणे म्हणून हे संमेलन यशस्वीरित्या आपल्या सर्वांना पार पाडायचे आहे’, असेही ते म्हणाले. अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमळनेर येथे होणार आहे.