जगात केवळ एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
गोरखनाथ (उत्तरप्रदेश) – या जगात एकच धर्म आहे तो म्हणजे ‘सनातन धर्म.’ अन्य सर्व संप्रदाय आणि उपासना पद्धती आहेत. सनातन धर्म मानवतेचा धर्म आहे. जर सनातन धर्मावर आघात झाला, तर संपूर्ण जगातील मानवतेवर संकट येईल, असे विचार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे मांडले. ते गोरखनाथ मंदिरात त्यांचे पितामह गुरु ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ यांच्या ५४ व्या आणि स्वतःचे गुरु ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ याच्या ९ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ७ दिवसांच्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या समारोपाच्या वेळी बोलत होते.
सौजन्य : IndiaTV
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रीमद्भागवताचा सार समजण्यासाठी विचार संकुचित असू नयेत. संकुचित विचार करणारे विराटतेचे दर्शन करू शकत नाहीत. या ७ दिवसांत तुम्ही तन्मयतेने ज्ञानयज्ञ श्रवण केला असेल, तर निश्चितच तुम्हाला जीवनात काही चांगले पालट जाणवतील. श्रीमद्भागवत महापुराणाने मुक्तीविषयी जे सांगितले आहे, ते केवळ सनातन धर्मातच मिळेल. अन्य कुठेही असे मिळणार नाही. याची निश्चिती स्वतः वेद व्यास हेच देऊ शकतात. जे येथे आहे, ते सर्वत्र आहे आणि जे येथे नाही, ते जगात कुठेही मिळणार नाही.