लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर जात आहे ! – मनोज जरांगे पाटील
जालना – सरकार सरकाचे काम करत आहे. आम्ही आमचे काम करत असून मराठा समाजातील लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर जात आहे, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. मराठा समाजाचे उपोषण सोडतांना राज्य सरकारने ३० दिवसांची समयमर्यादा मागितली आहे. तोपर्यंत आपण मराठा समाजातील नागरिकांची भेट घेण्यासाठी जात आहे. या दौर्यात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होत असून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला जात आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत मनोज जरांगे पाटील हे १२ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील ८७ गावांमध्ये जाऊन मराठा समाजाशी संवाद साधतील. या वेळी त्यांच्यासमवेत कायम २०० कार्यकर्ते आणि २५ वाहनांचा ताफा असेल.
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण मिळण्यासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा चालू केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला दिलेल्या समयमर्यादेत राज्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. ते कसे द्यायचे हे सरकारचे काम आहे. बैठकीला सरकारने आम्हाला बोलवावे, ही आमची अपेक्षाच नाही किंवा त्याविषयी अप्रसन्नताही नाही.