अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदारांचे कोट्यवधी रुपये कोषागारात पडून !
पुणे – महापालिका मागील अनेक वर्षांपासून ई-गव्हर्नन्सचा उपयोग करत आहे; मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे. वर्ष २०१९ पासून अनेक निविदाधारकांनी भरलेली कोट्यवधी रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम महापालिकेच्या कोषागारात पडून आहे. निविदाप्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन टेंडर प्रक्रिया राबवण्यात येते. महापालिका राज्यशासनाच्या ‘महाटेंडर’ या प्रणालीवरून निविदाप्रक्रिया राबवते. या प्रणालीवरील जाहिरातींना अनुसरून ठेकेदार आणि पुरवठादार ऑनलाईन निविदा भरतात.
ज्या दिवशी त्यांना कामाची मागणी दिली जाते, त्या वेळी निविदाप्रक्रियेच्या वेळी भरलेली बयाना रक्कम परत देण्याचा फॉर्मही भरला जातो; मात्र निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या आणि काम न मिळालेल्या अन्य ठेकेदारांची किंवा पुरवठादारांची सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुढील ‘महाटेंडर पोर्टल’वर निविदा उघडल्यावर पात्र ठेकेदाराची सुरक्षा अनामत रक्कम जमा करून उर्वरित ठेकेदारांच्या रकमा परत करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त बिनवाडे यांनी खाते प्रमुखांना दिल्या आहेत. प्रत्येक विभागाने ‘महाटेंडर पोर्टल’वर प्रसिद्ध झालेल्या निविदांची प्रलंबित प्रकरणे, वर्क ऑर्डर अपलोड करणे किंवा रद्द निविदा, फेरनिविदा केलेल्या प्रकरणांची सद्यःस्थिती आदी पोर्टलवर अद्ययावत् करणे बंधनकारक केले आहे.
संपादकीय भूमिकाअशा अधिकार्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्याकडून सव्याज रक्कम वसूल करणे आवश्यक ! |