आदर्श नागरी पतसंस्थेतील कर्जदारांच्या १९ मालमत्तांच्या जप्तीला अनुमती !
छत्रपती संभाजीनगर – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी संस्थेतील कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची सहकार कायद्यानुसार जप्ती करण्यात येणार आहे. त्या मालमत्ताचा ताबा मिळवण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी १९ कर्जदारांच्या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यातून पतसंस्थेचे २ कोटी ७ लाख रुपये रक्कम लिलावाद्वारे वसूल केली जाणार आहे.
‘आदर्श पतसंस्थेच्या सर्व कर्जदारांनी कर्जाची रक्कम तात्काळ भरावी. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करणे सुलभ होईल’, असे आवाहन जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रशासक समिती यांनी केले आहे. आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह अन्य संचालक सध्या अटकेत आहेत. आदर्श पतसंस्थेतील अपप्रकार उघड झाल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्या वसुलीला प्रारंभ केला आहे.