स्वच्छतेचे दायित्व !
एकीकडे भारत सरकारच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ चालू असून या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत, तर दुसरीकडे मात्र बसस्थानक, रेल्वेस्थानक, रस्ते सर्वत्र एक गोष्ट पहायला मिळते, ती म्हणजे या ठिकाणी स्वच्छता करणारे कर्मचारी तेथील कचरा गोळा करून दुसरीकडे नेईपर्यंत तिथे नव्याने कचरा टाकला जातो. यामध्ये वेफर्सची पाकिटे, चॉकलेटचे कागद, शीतपेयाच्या बाटल्या, टिश्यू पेपर अशा अनेक गोष्टी असतात. स्वच्छता असलेल्या ठिकाणी एवढ्या सहजपणे कचरा टाकतांना टाकणार्याच्या मनाला काहीच वाटत नाही, याची कमाल वाटते ! कचरा वाटेत टाकणार्या व्यक्तीपासून कचराकुंडी काही पावलांवर असली, तरीही कित्येक जण तिथे जाण्याची तसदी न घेता रस्त्यात कचरा टाकतात. हे सर्व कमी म्हणून की काय, एस्.टी. किंवा रेल्वे यांच्या खिडक्यांच्या फटीत एक-एक करत अनेकांनी अनेक खाऊची पाकिटे कोंबून ठेवलेली असतात. ‘खाऊन झाल्यावर तो कागद आपल्याच पिशवीत ठेवावा, घरी गेल्यावर किंवा जवळच्या कचराकुंडीत टाकावा’, हे लक्षात येऊ नये, एवढे लहान कुणी नसते. असे जे करतात, ते देशाचे म्हणे ‘सूज्ञ नागरिक’ असतात ! कृती म्हणायला अगदी लहानशीच आहे; पण यातून ‘देश ओळखला’ जातो, देशातील नागरिकांची वृत्ती, संस्कार, संस्कृती पाहिली जाते.
सार्वजनिक परिसराची स्वच्छता करणारे कामगार त्यांचे काम करत असतात. त्यामुळेच आपण आपल्या परिसरात स्वच्छता अनुभवतो. आपण ‘आपल्यामुळे परिसर अस्वच्छ होणार नाही’, हे पाहिले पाहिजे. ‘आपला परिसर स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे’, असे आपल्याला वाटायला हवे आणि त्यानुसार योग्य कृती आपल्याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्य कृती करत असेल, तर त्या व्यक्तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्य आहे. आपल्या योग्य वर्तनातून सामाजिक घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळत असते. आपण ज्या समाजात रहातो, त्याचे ऋण म्हणून आपण परिसर, सार्वजनिक ठिकाणे येथे स्वच्छता राखली पाहिजे. हे लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारता’सह ‘सुसंस्कृत भारत’ निर्माण करूया !
– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी.