आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्यातील मंदिरांचे सुशोभीकरण होणार !

केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचा सूचीमध्ये समावेश

गोव्यातील मंदिरांचे सुशोभीकरण

पणजी, २ ऑक्टोबर (वार्ता.) : पर्यटन विभाग देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आध्यात्मिक सहलींचे आयोजन करण्याची सिद्धता करत आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पर्यटन विकास महामंडळाने केपे, सत्तरी, काणकोण आणि सावर्डे येथील मंदिरांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे गोव्यातील मंदिरांकडे पर्यटकांचे अधिक लक्ष वेधून गोव्याची प्रतिमा ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रचलित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 (सौजन्य : In Goa 24×7)

गोवा पर्यटन विकास महामंडळाने सत्तरी येथील विविध मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (डी.पी.आर्.) सिद्ध करण्यासाठी सल्लागार नेमला आहे. या प्रकल्पावर ९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

धडे, सावर्डे येथील श्री बेताळ नागनाथ मंदिरासाठी ४ कोटी रुपये खर्चून प्रवेशद्वार उभारणे, विद्युत् रोषणाई करणे आणि मंदिर परिसरात विविध सुविधा पुरवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. हे कंत्राट ‘फोर्थ डायमेंशन आर्कीटेक्ट्स’ यांना देण्यात आले आहे. याच कंत्राटदाराला ४ कोटी रुपये खर्चून फातर्पा येथील श्री शांतादुर्गा मंदिराच्या सुशोभीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. आगोंद, काणकोण येथील श्री आगोंदेश्वर मंदिराचे ३ कोटी ७० लक्ष रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. हे कंत्राट ‘दाराशॉ अँड कंपनी’ यांना देण्यात आले आहे.