गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !
कार्यक्रमांतून बीभत्स आणि अश्लीलता यांचे प्रदर्शन होत असल्याने विरोध !
सिंधुदुर्ग – ‘देवगड अम्युझमेंट सेंटर’चे धैर्यशील पाटील आणि ‘ड्रायम् इव्हेंटस्’ यांच्या वतीने ‘कॉमेडीचे सुपरस्टार’ अन् ‘गौतमी पाटील डी.जे. डान्स शो’ या २ कार्यक्रमांचे ७ आणि ८ ऑक्टोबर या दिवशी कणकवली अन् कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यांगना गौतमी पाटील यांचे यापूर्वीचे काही कार्यक्रम वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांच्या कार्यक्रमाला विरोध वाढत असून सामाजिक माध्यमांतून त्याविषयीच्या ‘पोस्ट’ प्रसारित केल्या जात आहेत, तर काहींनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ‘या कार्यक्रमाला अनुमती देऊ नये’, अशी मागणी केली आहे. या कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यासाठी सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे की, या आधी महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये असे ‘डान्स शो’ वादग्रस्त ठरून बीभत्स आणि अश्लीलता यांचे प्रदर्शन करणारे, तसेच तरुणांना एकप्रकारे उत्तेजित करणारे ठरलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने अशा कार्यक्रमांवर बंदी घालून जीवित समाजमनाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे.
‘या कार्यक्रमांसाठी खासगी आणि पोलीस अशा दोन्ही पद्धतींचे संरक्षण ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. या कार्यक्रमांसाठी कायदा आणि सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने आयोजक म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत’, असे कार्यक्रमाचे आयोजक ‘देवगड अम्युझमेंट सेंटर’चे धैर्यशील पाटील आणि ‘ड्रायम् इव्हेंटस्’चे गौरव मुंज यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील यांचे महाराष्ट्रातील अनेक कार्यक्रम वादग्रस्त ठरले आहेत. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातला. कार्यक्रमाची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. परभणी येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या वेळी गौतमी पाटील यांनी नृत्य चालू केल्यानंतर उपस्थितांनी हुल्लडबाजी केली. खुर्चा फेकल्या आणि तोडफोड केली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘प्रगत सिंधुदुर्ग मुंबई’चे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना इ मेल करून ‘गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला अनुमती देऊ नये’, अशी मागणी केली आहे. यामध्ये चौधरी यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सामाजिक संस्कृती पहाता जिल्ह्यात भजन, कीर्तन, दशावतारी नाट्यप्रयोग, फुगड्या, अशा लोककला जपण्याचे काम केले जाते. असे असतांना असे (गौतमी पाटील यांचे) कार्यक्रम जिल्ह्यात होणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. तसेच अशा कार्यक्रमात तरुणवर्ग उत्तेजित होऊन त्यांच्याकडून हुल्लडबाजी आणि अन्य आक्षेपार्ह वर्तन घडल्यास पोलीस यंत्रणेलाही त्रास होण्याची शक्यता आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी असे कार्यक्रम आयोजित करून जिल्ह्यातील तरुणांची डोकी भडकावणे योग्य नाही, अशी आमची धारणा आहे.
संपादकीय भूमिका
|