नागपूर येथे २ मासांत ‘रुग्‍णमित्रां’साठी १८ सहस्र इच्‍छुकांचे अर्ज !

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजपची जय्‍यत सिद्धता !

नागपूर – राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी म्‍हणजे गत २२ जुलै या दिवशी ‘जिथे सेवा तिथे देवा’ असे म्‍हणत भाजपच्‍या प्रदेशाध्‍यक्षांनी राज्‍यात ५० सहस्र ‘रुग्‍णमित्र’ नियुक्‍त करण्‍याची घोषणा केली होती. त्‍यानंतर २ मास ८ दिवसांत रुग्‍णमित्रासाठी १८ सहस्र इच्‍छुकांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती भाजपचे वैद्यकीय आघाडीचे प्रदेश प्रमुख बाळासाहेब हरपळे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

बाळासाहेब हरपळे म्‍हणाले की,…

१. १८ सहस्र अर्जांची पडताळणी चालू आहे. हे सर्व ‘रुग्‍णमित्र’ ‘मानसेवी’ म्‍हणून काम करणार आहेत. यासाठी भाजप ‘वॉररूम’ने ९६४९४८५२४२ हा भ्रमणभाष क्रमांक प्रसारित केला आहे. त्‍यावर ‘मिस्‍ड कॉल’ (सुटलेला संपर्क) द्यायचा आहे. त्‍यानंतर पक्ष कार्यालयातून संबंधिताला दूरभाष जातो. त्‍याची तपशीलवार माहिती विचारली जाते.

२. निश्‍चिती झाल्‍यावर ‘रुग्‍णमित्र’ म्‍हणून नोंदणी केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की, संबंधिताला ओळखपत्र देण्‍यात येईल.

३. संबंधित रहात असलेल्‍या परिसरातील सरकारी रुग्‍णालयात त्‍याची ‘रुग्‍णमित्र’ म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येईल.

४. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यत ‘रुग्‍णमित्रां’ची नेमणूक केली जाईल. हे ‘रुग्‍णमित्र’ जनतेला आवश्‍यक सर्व वैद्यकीय साहाय्‍य करतील. त्‍यांना ‘पंतप्रधान आयुष्‍यमान भारत’ योजना, ‘महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य’ योजनेसह केंद्र आणि राज्‍य सरकार यांच्‍या सर्व योजनांची माहिती दिली जाईल.

५. सेवेसाठी काही रुग्‍णवाहिका घेण्‍यात येणार आहेत. सरकार पोचण्‍याआधी ‘रुग्‍णमित्र’ पोचतील अशी योजना आहे.