जिल्हा परिषद शाळा टिकू द्या !
छत्रपती संभाजीनगर येथे प्राथमिक शिक्षक संघाचा ‘महाआक्रोश’ मोर्चा !
छत्रपती संभाजीनगर – ‘आम्हाला फक्त शिकवू द्या. जिल्हा परिषद शाळा टिकू द्या’, अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विराट महाआक्रोश मोर्चा २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी पाठिंबा घोषित केला होता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकरराव वालतुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्व शिक्षक सहस्रोंच्या संख्येने ‘महाआक्रोश’ मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला.
छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून क्रांती चौक येथून या विराट महाआक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. शिस्तबद्ध मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. त्यानंतर समारोप झाला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या अशा…
१. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना फक्त मुलांना शिकवू द्या.
२. शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे.
३. जुने निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे.
४. शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट आस्थापनांना न देणे.
५. बी.एल्.ओ. कामासाठी शिक्षकांना वेठीस न धरता त्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी.
६. मुख्यालयी रहाण्याची अट रहित करावी.
७. वस्तीशाळा शिक्षकांना शाळा स्थापनेपासून नोकरीत कायम करण्यात यावे.
८. संच मान्यता त्रुटी दूर करण्यात यावी.
९. स्थानांतर प्रक्रियेतील त्रुटी दूर करावी.
१०. नवीन शिक्षक भरतीपूर्वी जिल्ह्यांर्गत आणि आंतरजिल्हा स्थानांतर प्रक्रिया राबवण्यात यावी.
११. नवीन शिक्षक भरती करण्यात यावी.
१२. शिक्षकांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
१३. सर्व थकित देयकांसाठी त्वरीत अनुदान मिळावे.