सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांचे आयोजन

मिरज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’च्‍या प्रसंगी विविध मान्‍यवर

मिरज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या यात्रेस सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, तसेच राज्‍याभिषेक सोहळा यांची माहिती भावी पिढीला मार्गदर्शक ठरावी, या मुख्‍य उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

मिरज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रे’च्‍या प्रसंगी विविध मान्‍यवर
‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रे’साठी असलेला रथ

१ ऑक्‍टोबरला ईश्‍वरपूर येथून या यात्रेचा प्रारंभ झाला. वाळवा, पलूस, पुणदी, कुंडल, बुर्ली, अमणापूर, भिलवडी, नांद्रे, कुपवाड, सांगली येथे यात्रेचे भव्‍य स्‍वागत, पूजन करण्‍यात आले. यात्रेत ध्‍येयमंत्र-प्रेरणामंत्र म्‍हणण्‍यात येत होता. मिरज येथे २ ऑक्‍टोबरला सकाळी शिवतीर्थ येथे या यात्रेचे हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या उपस्‍थितीत ‘जय भवानी-जय शिवाजी’च्‍या गजरात स्‍वागत करण्‍यात आले. या प्रसंगी भारतीय वायूदलाचे सेवानिवृत्त विंग कमांडर श्री. प्रकाश नवले, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, शिवसेनेचे श्री. तानाजी सातपुते, श्री. आनंद राजपूत, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव, जिल्‍हा सहमंत्री श्री. सुधीर अवसरे, अधिवक्‍ता बाळासाहेब देशपांडे यांसह अन्‍य मान्‍यवरही उपस्‍थित होते.

सांगली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रे’च्‍या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. आकाश जाधव (उजवीकडे) यांचे स्‍वागत करतांना माजी नगरसेविका सौ. गीतांजली राहुल ढोपे-पाटील (डावीकडे), तसेच अन्‍य मान्‍यवर

सांगलीत प्रभाग क्रमांक १७ मध्‍ये यात्रेचे स्‍वागत करण्‍यात आले. या प्रसंगी माजी नगरसेविका सौ. गीतांजली राहुल ढोपे-पाटील, भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते श्री. श्रीकांत शिंदे (तात्‍या), तसेच अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.