नागपूर आणि धुळे येथील २ सहकारी सूतगिरण्यांवर आयकर विभागाच्या धाडी !
धुळे – येथील तुकाराम उपाख्य बंडू किसन तागडे यांच्या ‘मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणी’वर नागपूर येथील आयकर विभागाने ३० सप्टेंबर या दिवशी धाड घातली. तागडे हे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. धुळे येथील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवरही धाड घालण्यात आली आहे. येथे कोणत्या विभागाने धाड घातली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेसने आमदार पाटील यांच्यावर नुकतेच अमरावती आणि नागपूर लोकसभा निवडणुकीचे दायित्व सोपवले होते. त्यानंतर लगेच त्यांच्या कारखान्यावर ही धाड घालण्यात आली. या धाडी घालण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूतगिरणीचे लेखापरीक्षण आणि पडताळणी यापूर्वीच झाली आहे. नियमांचे पालन करत कामकाज चालू आहे, असे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.