वसई येथील राष्ट्रचेतना सभेला भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह उपस्थित रहाणार !
वसई (पालघर) – ८ ऑक्टोबर या दिवशी सनातन धर्मसभेच्या वतीने साईनगर मैदान वसई पश्चिम येथे ‘प्रखर राष्ट्रचेतना सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भोपाळ येथील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह उपस्थित रहाणार आहेत. या वेळी वसईतील समस्त हिंदु संघटनांकडून त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. दुचाकींची भव्य फेरी काढून स्वागत करण्यात येणार आहे. या सभेसाठी लक्ष्मीबाई गोशाळा आश्रमाचे प्रमुख सदानंद बन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समितीची स्थापना झाली असून सभेच्या सिद्धतेसाठी हिंदुत्वनिष्ठ सरसावले आहेत. ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी हॉटेल शेल्टर येथे पत्रकार परिषद होईल. सायंकाळी ५ नंतर हिंदु संस्थांकडून भव्य स्वागत यात्रा काढून नंतर साध्वी यांचा समस्त हिंदु संघटनांकडून सत्कार करण्यात येईल, असे श्री. उत्तम कुमार यांनी सांगितले. सभेविषयी अधिक माहितीसाठी श्री. उत्तम कुमार यांना ९३२३५२८१९७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.