नाशिक येथे कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प !
व्यापारी आक्रमक, शेतकरी चिंतेत !
नाशिक – कांदा व्यापाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिल्यामुळे येथील बाजारपेठेतील कोट्यधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. संप अजून किती दिवस चालेल, हे निश्चित नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ३० सप्टेंबर या दिवशी पिंपळगाव येथे झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संप चालूच ठेवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कांद्याचे खरेदीविक्री व्यवहार ठप्पच रहाणार आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्काच्या विरोधात गेल्या १२ दिवसांपासून व्यापाऱ्यांचा संप चालू आहे; मात्र या संपामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
‘कांदा व्यापारी असोसिएशन’चे प्रवक्ते प्रवीण कदम म्हणाले की, सरकारने आमची एकही मागणी मान्य केलेली नाही. सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद कायम राहील. असोसिएशनचा खासगी कांदा बाजार चालू करण्याचा प्रयत्न आहे. नाफेडच्या माध्यमातून कांद्याचे शुल्क पाडून शेतकऱ्यांची हानी करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे; मात्र त्याचे खापर व्यापाऱ्यांच्या माथी फोडले जात आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या, तर लिलाव चालू करण्यास सिद्ध आहे. विंचूरमध्ये काही व्यापाऱ्यांवर दबाव टाकून कांदा लिलाव चालू केले गेले.
संपादकीय भूमिकासंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरून राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यापेक्षा वैध मार्गाने मागण्या कराव्यात ! |