मिरज येथे गणेशोत्सव मंडळांची उत्साही वातावरणात आणि शांततेत २४ घंटे मिरवणूक !
१७३ गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे गणेश तलावात विसर्जन !
मिरज, १ ऑक्टोबर (वार्ता.) – अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरज येथे शांततेत श्री गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडली. अनुमाने १७३ श्री गणेशमूर्तींचे येथील गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. कृष्णा घाट येथे बांधकाम चालू असल्याने तेथे मूर्ती घेऊन जाणे कष्टाचे होते. त्यामुळे कृष्णा घाटात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले नाही. मिरवणुकीत काही मंडळांनी ‘डॉल्बी’चा सर्रास वापर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी विचार करत आहेत, अशी माहिती मिरज शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
गणेश तलावाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने यांत्रिक बोट, तराफा, क्रेन आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. १४० लहान, तर मोठ्या ३३ गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तींचे गणेश तलावात विसर्जन करण्यात आले. रात्री १२ नंतर मंडळांचे ध्वनीक्षेपक बंद करण्यात आले. मोठ्या मूर्तींचे क्रेनद्वारे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक मार्गावर दुतर्फा विविध पक्ष आणि संघटना यांनी उभारलेल्या स्वागत कमानी विद्युत् रोषणाईने झगमगत होत्या. मिरवणुकीत बॅण्ड, बँजो, झांजपथक, ढोल, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आला.
शहरातील संवेदनशील ठिकाणांवर अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर महापालिका, जनसुराज्य शक्ती, रिपाई आणि शिवसेना यांच्या वतीने ‘स्वागत कक्ष’ उभारण्यात आले होते. त्यांनी मिरवणूक मार्गावरील गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे स्वागत केले. विश्वशांती मंडळ, मनसे, मराठा महासंघ, हिंदु एकता आंदोलन, एकता मित्र मंडळ, संभाजी मंडळ, शिवसेनेच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही, उंच मनोरे आणि इमारती यांवरून पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकावर वापर करणाऱ्या आणि रात्री विलंबापर्यंत मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.