सतत साधकांच्‍या प्रगतीचा ध्‍यास असणार्‍या आणि साधकांना घडवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुप्रिया माथूर !

‘सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करणार्‍या सौ. सुप्रिया माथूर या साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍यांंच्‍याकडून व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. साधकांना स्‍पष्‍टपणे चुका सांगून स्‍वतःच्‍याही चुका विचारणे

व्‍यष्‍टी आढावा घेत असतांना ‘ताईने (सौ. सुप्रिया माथूर हिने) सांगितलेले समोरच्‍या साधकाच्‍या लक्षात आले का?’, हे ती त्‍या त्‍या वेळी स्‍पष्‍ट करून घेते आणि ‘सूत्र सांगतांना तिचे स्‍वतःचे काही चुकले का ?’, असेही ती विचारते.

२. आढावा देणार्‍या साधकाला साहाय्‍य करण्‍यासाठी अन्‍य साधकांना सूत्रे विचारणे

‘एखाद्या साधकाने आढावा दिल्‍यानंतर अन्‍य साधकांना त्‍याविषयी काही सांगायचे आहे का ?’, असे ती सर्वांना विचारते. ‘साधकांनी आपले मत सांगतांना सूत्र स्‍पष्‍ट करून सांगावे, जेणेकरून ज्‍या साधकाला आपण साहाय्‍य करतो, त्‍या साधकाला प्रयत्नांची योग्‍य दिशा मिळते, असे ती सांगते.

कु. माधुरी दुसे

३. तळमळ

एकदा आढावा संपल्‍यावर एका साधिकेच्‍या हावभावावरून ताईने तिला प्रश्‍न विचारायला आरंभ केला. तेव्‍हा ताईच्‍या लक्षात आले की, त्‍या साधिकेच्‍या मनाची स्‍थिती चांगली नाही. तिने साधिकेला आध्‍यात्मिक उपाय आणि स्‍वयंसूचना सत्रे करायला सांगितली. प्रश्‍न विचारून ताईने तिला साहाय्‍य केले आणि त्‍या साधिकेला त्‍या स्‍थितीतून बाहेर काढले.

४. साधकांना साहाय्‍य करणे

ताईने साधकांच्‍या साधनेचा आढावा घेतांना साधकांना कधीही मानसिक स्‍तरावर जपले नाही. आवश्‍यक तिथे तत्त्वनिष्‍ठ राहून आवश्‍यक तिथे प्रेमाने आणि आवश्‍यक तिथे भावाच्‍या स्‍तरावर सांभाळून साहाय्‍य केले.

५. स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्‍हणजे नारायण अस्‍त्र असणे आणि त्‍याला शरण गेल्‍यावर ईश्‍वराने प्रयत्न करवून घेऊन आनंद देणे

ताईच्‍या स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्‍या आढावा सत्‍संगात बसल्‍यानंतर मला वाटले, ‘प्रक्रिया हे एक जणू नारायण अस्‍त्र आहे.’ महाभारताच्‍या वेळी नारायण अस्‍त्राची तोड श्रीकृष्‍णाकडे नव्‍हती. श्रीकृष्‍णाने पांडवांना नारायण अस्‍त्राला शरण जायला सांगितले. भीमाच्‍या मनात त्‍या अस्‍त्राला विरोध करण्‍याचा विचार होता, तोपर्यंत नारायण अस्‍त्र शांत झाले नाही. भीम संपूर्ण शरण गेल्‍यावर ते लुप्‍त झाले आणि पांडवांचा जीव वाचला. त्‍याप्रमाणे जोपर्यंत प्रक्रियेला आपण पूर्ण शरण जात नाही, तोपर्यंत ती आत्‍मसात् होऊ शकत नाही. ‘मी प्रक्रिया करीन, मला जमेल’, अशा विचारात प्रक्रिया करत राहिलो, तर ती आत्‍मसात् होत नाही. मनापासून प्रक्रिया केल्‍याने प्रत्‍येक प्रयत्न ईश्‍वर करवून घेतो आणि आनंदही देतो.’

६. प्रसंग आणि प्रकृती यांत न अडकता साधनेत पुढे जाणे

दिवसभरात आपल्‍या समवेत प्रसंग आणि वेगवेगळ्‍या प्रकृतींशी संबंध येणे’, असे घडत असते अन् त्‍या वेळी आपल्‍या प्रतिक्रियाही होत असतात. अशा वेळी ‘आपण कसा दृष्‍टीकोन ठेवायचा ?’, हे ताईने एका उदाहरणातून आम्‍हाला सांगितले. ताईने सांगितले, ‘ही भगवंताची बाग आहे. त्‍यात आपण माळी आहोत. माळी झाडांना पाणी घालतांना त्‍याच्‍या पायात खडा टोचला, तर तो तिथेच थांबत नाही. तो खडा काढून पुढील झाडांना पाणी घालायला जातो. त्‍याप्रमाणे सेवा करतांना अनेक प्रकृतीच्‍या व्‍यक्‍ती भेटतील आणि अनेक प्रसंग घडतील; परंतु ते प्रसंग किंवा प्रकृती यांमध्‍ये न अडकता आपल्‍याला साधनेत पुढे जायचे आहे. ‘माळी बनून देवाची सेवा करायची आहे’, असे सांगितले.

७. मनातील अडथळे दूर करणे

साधनेमध्‍ये प्रयत्न करतांना ज्‍या प्रसंगापासून दूर जाण्‍यासाठी आपण पळवाट काढतो किंवा ज्‍या व्‍यक्‍तींपासून आपण दूर रहातो, असेच प्रसंग ताई आढाव्‍यात लिहून आणायला सांगते. यामुळे मनातील अडथळे दूर होऊन साधक साधनेत पुढे जाऊ शकतो.

८. ‘साधकांनी आढाव्‍यात समरस व्‍हावे’, यासाठी प्रयत्न करणे

आढावा चालू असतांना एखाद्या साधकाच्‍या मनात अन्‍य विचार असतील किंवा त्‍या साधकाचे आढाव्‍यात लक्ष नसेल, तर ताई ते लगेच ओळखून त्‍या साधकाला ‘आढाव्‍यात आता तुम्‍हाला काय शिकायला मिळाले ?’, असे विचारते. तेव्‍हा  ‘आढाव्‍यात लक्ष नव्‍हते’, असे त्‍या साधकाच्‍या लक्षात येते. परिणामी तो साधक आणि अन्‍य साधकही संपूर्ण आढावा एकाग्रतेने ऐकू लागतात आणि प्रत्‍येकाच्‍या आढाव्‍यातून प्रत्‍येक साधकाला नवीन सूत्रे शिकायला मिळतात.’

– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०२१)