कोलकाता येथील पू. डॉ. शिवनारायण सेन यांना स्‍वप्‍नात विविध दृश्‍ये दिसणे आणि त्‍यानंतर मन निर्विचार होऊन शांतीची अनुभूती येणे

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्‍वप्‍न पडले. त्‍यात मला पुढील दृश्‍ये दिसली.

पू. डॉ. शिवनारायण सेन

१. स्‍वप्‍नात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या हाताचा झालेला स्‍पर्श अतिशय मुलायम असणे आणि त्‍या स्‍पर्शाने मन निर्विचार होऊन आनंद अन् शांती यांची अनुभूती येणे

‘१७.८.२०२३ या दिवशी रात्री मला एक स्‍वप्‍न पडले. त्‍यात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्‍या स्‍वप्‍नात आले. तेथे मला हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारेही आल्‍याचे दिसले. गुरुदेवांनी माझ्‍या मस्‍तकावर हात ठेवला. नंतर त्‍यांनी माझा हात त्‍यांच्‍या हातात घेतला. त्‍यांच्‍या हाताचा स्‍पर्श मला वेगळाच वाटला. त्‍यांचे हात अतिशय मुलायम होते. गुरुदेवांचा स्‍पर्श होण्‍यापूर्वी माझ्‍या मनामध्‍ये विचारांचे प्रमाण पुष्‍कळ वाढले होते. त्‍यांचा स्‍पर्श होताच माझे मन एकदम निर्विचार झाले. त्‍यांच्‍या स्‍पर्शाने मला शब्‍दांच्‍या पलीकडील आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.

२. हनुमानाच्‍या मोहक रूपाचे दर्शन होणे

स्‍वप्‍नात मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातून बाहेर पडलो. तेव्‍हा मला एक मिरवणूक जातांना दिसली. त्‍या वेळी मी श्री दुर्गादेवीचा जयघोष केला आणि मागे वळून पाहिले, तर मला विराट रूपातील हनुमानाचे दर्शन झाले. हनुमान अतिशय मोहक रूपात होता.

३. गुरु पंडित उपेंद्र मोहन यांच्‍या खडावा अन् दिवंगत वडील यांचे दर्शन होणे

त्‍यानंतर मी स्‍वप्‍नातच प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे ‘शास्‍त्र धर्मप्रचार सभे’च्‍या आश्रमात पोचलो. (येथे आधी माझे गुरु पंडित उपेंद्र मोहन यांचे निवासस्‍थान होते.) तेथे मला पंडित उपेंद्र मोहन यांच्‍या खडावा आणि गदाधराची (श्रीविष्‍णूची) पावले असलेला एक धातूचा पत्रा दिसला. तेथे मला माझे दिवंगत वडील दिसले. मी वडिलांना विचारले ‘या दोन्‍ही वस्‍तू मी घेऊन जाऊ का?’, तर ते ‘हो’, असे म्‍हणाले.

त्‍याच क्षणी मला माझ्‍या मोठ्या दिवंगत बहिणीचेही दर्शन झाले. तिला मी ‘जीजी’, असे म्‍हणायचो. त्‍यानंतर मला जाग आली. जाग आल्‍यावर माझे मन निर्विचार झाले होते आणि मी शांती अनुभवत होतो.’

– पू. डॉ. शिवनारायण सेन, कोलकाता (१९.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक