हिंदु वारसा मास !

ऑक्‍टोबर मास हिंदूंसाठी विशेष आहे. या मासात नवरात्री आणि दिवाळी हे दोन मोठे सण येतात. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या जॉर्जिया राज्‍याने ‘ऑक्‍टोबर’ या मासाला अधिकृतपणे ‘हिंदु हेरिटेज मंथ’ (हिंदु वारसा मास) म्‍हणून घोषित केले आहे. राज्‍यातील हिंदु-अमेरिकन समुदायाचे योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्‍यात आला आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून या संदर्भात मागणी करत होत्‍या. या वर्षीच्‍या प्रारंभी जॉर्जिया विधानसभेने ‘हिंदुफोबिया’चा (हिंदु धर्माविरुद्ध पूर्वग्रह) निषेध करणारा ठराव संमत केला. असा ठराव पारित करणारे ते पहिले अमेरिकी राज्‍य बनले आहे. या प्रस्‍तावात अमेरिकन समाजाच्‍या सांस्‍कृतिक जडणघडणीस, तसेच लाखो लोकांचे जीवन सुधारण्‍यास योग, आयुर्वेद, ध्‍यान, भजन, संगीत आणि कला यांमध्‍ये हिंदु समुदायाने दिलेल्‍या योगदानावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे.

‘हिंदु वारसा मास’ ही एक जागतिक चळवळ आहे. जी हिंदु धर्मातील परंपरा आणि हिंदु लोकांचे मानवी समाजातील योगदान अधोरेखित करते. हिंदु धर्म हा जगातील तिसरा सर्वार्ंत मोठा धर्म आहे. या धर्माचे जगभरात १०० कोटी अनुयायी आहेत. अनुमाने ३० लाख हिंदु लोक अमेरिकेत रहात असून त्‍यांचे तेथील राजकारण आणि समाजकारण यांतही महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्‍यपाल ब्रायन केम्‍प म्‍हणाले की, हिंदु-अमेरिकन समुदायाने जॉर्जियन लोकांचे जीवन समृद्ध करून राज्‍याच्‍या जीवन शक्‍तीसाठी मोठे योगदान दिले आहे. ‘हिंदु वारसा मास’ हा भारतीय संस्‍कृती आणि तिथे रुजलेल्‍या विविध आध्‍यात्‍मिक परंपरा यांवर लक्ष केंद्रीत करून साजरा केला जाईल. हे सूत्र विशेष महत्त्वाचे आहे. आपल्‍याकडे सण हे मौजमजेचा विषय झाले असतांना त्‍यांनी ‘आध्‍यात्मिक परंपरांवर’ लक्ष देण्‍याविषयी म्‍हटले आहे. कुठे सनातन हिंदु धर्म, संस्‍कृती यांविषयी श्रद्धा असणारे अमेरिकेतील जॉर्जिया राज्‍याचे राज्‍यपाल आणि कुठे ‘सनातन धर्मा’ची डेंग्‍यू, मलेरिया, कोरोना महामारी, एड्‍स आणि कुष्‍ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे भारतातील तमिळनाडू राज्‍याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा ! अमेरिकेतील लोकांचे समाजजीवन हिंदु धर्मामुळे पालटत आहे आणि भारतात मात्र उलट घडत आहे. हिंदु धर्म, संस्‍कृती, श्रद्धा यांवर घाला घालून देशाची एकता, अखंडता आणि शांतता धोक्‍यात आणली जात आहे. भारतातील अशा धर्मद्रोही शक्‍तींविरुद्ध सरकारने कारवाई केली, तरच देशाला गतवैभव प्राप्‍त होईल !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव