कल्‍याण येथे अखंड वाचनयज्ञाचे आयोजन !

ठाणे, १ ऑक्‍टोबर (वार्ता.) – अक्षरमंच सामाजिक सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान, बालक मंदिर संस्‍था आणि कल्‍याण सार्वजनिक वाचनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कल्‍याण येथे १४ आणि १५ ऑक्‍टोबर या दिवशी सलग ३६ घंटे ‘अखंड वाचनयज्ञा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. १४ ऑक्‍टोबरला सकाळी ८ वाजल्‍यापासून १५ ऑक्‍टोबरला रात्री ९ पर्यंत बालकमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

नव्‍या पिढीचे अभ्‍यासाच्‍या व्‍यतिरिक्‍तचे वाचन न्‍यून होत आहे. वाचणारी जुनी आणि मध्‍यम पिढीही विविध ‘डिजिटल’ माध्‍यमांच्‍या आहारी जात आहे. या सर्वांना पुन्‍हा वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे. अभिवाचन सत्र, कथावाचन, ललितवाचन, काव्‍य संमेलन, बालसाहित्‍य वाचन, महिलांचे काव्‍यसंमेलन, पत्रकारांचे अभिवाचन, भयकथा आणि आध्‍यात्‍मिक साहित्‍य वाचन अशा विविध सत्रांत हा ‘वाचनयज्ञ’ पार पडणार आहे.

या उपक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करणार्‍या वाचकाला सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्‍तक भेट देऊन सन्‍मानित केले जाणार आहे. हा उपक्रम विनामूल्‍य असून पूर्वनोंदणी करणे आवश्‍यक आहे. या वाचनयज्ञात एक सहस्रांहून अधिक वाचकांनी नोंदणी केली आहे. १० सहस्रांहून अधिक रसिकांनी सहभागासाठी नाव नोंदवले आहे. ‘अधिक माहितीसाठी ८७७९६४४९९२ या क्रमांकावर संपर्क साधावा’, असे सांगण्‍यात आले आहे.