सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !
|
दोडामार्ग – ‘जय शिवाजी, जय भवानी’, असा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात शिवरथासह पारंपरिक वेश परिधान केलेल्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत येथे ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले. ‘शिवशौर्य यात्रे’च्या या परिक्रमेमुळे जिल्ह्यात शिवमय वातावरणासह नवचैतन्य निर्माण झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे आणि विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला असून १५ ऑक्टोबर या दिवशी दादर (मुंबई) येथे यात्रेची सांगता होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, तसेच राज्याभिषेक सोहळा यांची माहिती भावी पिढीला मार्गदर्शक ठरावी, या मुख्य उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
३० सप्टेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता दोडामार्ग येथील सिद्धिविनायक मंदिरात यात्रेसाठी बनवण्यात आलेल्या आणि शिवछत्रपतींचा सुंदर अन् आकर्षक पुतळा असलेल्या ‘शिवरथा’चे पूजन करण्यात आले, तसेच येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, येथील उद्योजक तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक, ‘शिवशौर्य यात्रे’च्या आयोजक समितीचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत ‘शिवशौर्य यात्रा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे, रत्नागिरी विभागाचे विभागमंत्री विवेक वैद्य, ‘मातृशक्ती’च्या प्रमुख विनिता देसाई, जयवंत आठलेकर, यात्राप्रमुख मनोज वझे, यात्रा नियोजन प्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते.
मालवण येथे यात्रेचे आगमन झाल्यावर शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहात सभा झाली. रात्री मालवण येथे मुक्काम करून १ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता कणकवली शहराकडे यात्रा मार्गस्थ होणार आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यात्रेचे आगमन होणार असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान, पोवाडे, विविध गीते आदी सादर केले जाणार आहेत. दुपारी ही यात्रा नांदगाव, कासार्डे, तळेरे, खारेपाटणमार्गे रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहे.
हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी ‘शिवशौर्य यात्रा’ ! – विवेक कुलकर्णी, बजरंग दल
कुडाळ : हिंदूंचा इतिहास पराजयाचा नसून कायम विजयाचा राहिला आहे. हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली, तरीही सनातन हिंदु धर्म संपला नाही आणि कधीही संपणार नाही. आता आपल्याला हिंदु धर्म रक्षणासाठी हिंदु युवती, युवक आणि समाज यांच्यातील शौर्य जागृत करायचे आहे. यासाठी ही ‘शिवशौर्य यात्रा’ आहे, असे प्रतिपादन बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी यांनी कुडाळ येथे यात्रेच्या स्वागताच्या वेळी केले. भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी कुडाळ येथे यात्रेचे स्वागत केले.