मुंबई येथे मराठी महिलेला घर नाकारणार्या सचिवाची पदावरून हकालपट्टी !
मुंबई – येथील मुलुंड भागात तृप्ती देवरूखकर या मराठी महिलेला घर नाकारण्यात आले होते. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेताच संबंधित व्यक्तीने क्षमा मागितली. सोसायटीच्या सदस्यांनी घर नाकारणार्या सोसायटीच्या सचिवाची हकालपट्टी केली आहे. तृप्ती देवरूखकर यांनी मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली.
|
या संदर्भात बोलतांना तृप्ती देवरूखकर म्हणाल्या की, मराठी माणसाला घर नाकारण्याचा अनुभव आल्यानंतर मला सर्वांत आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी संपर्क केला. ते माझ्यासमवेत आले आणि घर नाकारणार्या सचिवाला खडसावले. मराठी माणसाला घर नाकारले; म्हणून ‘त्या इमारतीच्या सचिवांनी माझी आणि सर्व मराठी माणसांची मराठीत क्षमा मागावी’, अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी मराठीत क्षमा मागितली. मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी मला भेटण्याची वेळ दिली; कारण मला त्यांचे आभार मानायचे होते. मनसैनिक सर्वांत आधी आमच्या साहाय्याला आले. त्यानंतर सर्व पक्ष आले. आम्ही पोलीस ठाण्यातही तक्रार प्रविष्ट केली आहे. नंतर सर्वच पक्षांचे लोक आले.
तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला सोसायटीत कार्यालय घेण्यास नकार देऊन उलट अरेरावीची भाषा करणाऱ्या ठक्कर बापलेकाची अखेर जिरली.https://t.co/NjSlhdAD5a
— Saamana (@SaamanaOnline) September 30, 2023
शर्मिला ठाकरे यांनी धाडसाचे कौतुक केले !
तृप्ती देवरूखकर म्हणाल्या की, मी धाडसाने पुढे आले म्हणून शर्मिला ठाकरे यांनी माझे कौतुक केले आहे; कारण अनेक मराठी लोकांसमवेत हे प्रकार घडतात; मात्र कुणी बोलत नाही. मी हे प्रकरण समोर आणले आणि मनातील राग व्यक्त केला. याचे शर्मिला ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
संपादकीय भूमिका :मराठीजनांवर केला जाणारा अन्याय, तसेच मराठी भाषेची सर्वत्र होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे ! |