नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !

(छायाचित्र सौजन्य : मुंबई तक)

नागपूर – श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या हिलटॉप एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २९ सप्टेंबर या दिवशी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अनेक तरुणांनी गोंधळ घातला. ते तेथील प्लास्टिकच्या आसंद्यांवर उभे राहिले. त्यामुळे मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या आसंद्या तुटल्या. काही हुल्लडबाजांनी तुटलेल्या आसंदीचे तुकडे हवेत भिरकावले.

  • तरुण आसंदीवर उभे राहिल्याने अनेक आसंद्या तुटल्या !
  • पोलिसांकडून तरुणांवर लाठीमार !  

गौतमी यांना पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती; मात्र गौतमी कार्यक्रमासाठी अनुमाने २ घंटे विलंबाने पोचल्या. त्यामुळे काही तरुण संतापले. नृत्य चालू होताच तरुणांनी गोंधळ घातला. आयोजक आणि पोलीस त्यांची समजूत काढत होते; परंतु तरीही हुल्लडबाज तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या आपसांतील धक्काबुक्कीमुळे समोरचे बेरिकेड्स खाली कोसळले. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी तरुणांवर लाठीमार केला. हुल्लडबाज तरुणांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उरलेला कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

संपादकीय भूमिका :

  • गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा ! 
  • अशी बेधुंद तरुणाई देशाचे भवितव्य काय घडवणार ?