ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
चंद्रपूर येथील ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांचे उपोषण २१ दिवसांनी मागे !
चंद्रपूर – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे; मात्र ते करतांना ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी आणि विजय बल्की यांनी उपोषण सोडले आहे. ‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये’, या मागणीसाठी त्यांनी २१ दिवसांपासून हे आंदोलन चालू केले होते.
उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन रवींद्र टोंगे यांच्या उपोषणाची सांगता..!@Dev_Fadnavis#OBC pic.twitter.com/gGw9Ya3PSn
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 30, 2023
२८ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसमवेत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. राज्य सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ओबीसींच्या कोणत्याही सूत्रावर सरकारची नकारात्मक भूमिका नाही’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.