‘ईडी’कडून ८ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !
मुंबई येथील ‘जंबो कोविड सेंटर घोटाळा’ प्रकरण
मुंबई – येथील कोविड केंद्रात अनधिकृत आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) सत्र न्यायालयात ८ सहस्र पानी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. त्यात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून सुजित पाटकर आणि आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.
‘जंबो कोविड सेंटर’ घोटाळ्यात आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता. यात सुजित पाटकर यांना अनधिकृतरित्या कंत्राट दिले गेल्याचा दावा करण्यात आला, तसेच बनावट देयके दाखवून अतिरिक्त लाभ मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि आधुनिक वैद्य बिसुरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत पी.एम्.एल्.ए. न्यायालयात सुजित पाटकर यांना उपस्थित करण्यात आले होते. त्या वेळी ‘ईडी’ने आरोपपत्र प्रविष्ट केले. आरोपपत्रासमवेत १ ध्वनीचित्र चकतीही जोडलेली आहे. त्याची छाननी न्यायालय करणार आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम्.जी. देशपांडे यांच्याकडे हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडूनही अन्वेषणाची आवश्यकता !
‘कोविड केंद्रात ५० ते ६० टक्केच कर्मचारी कामावर असतांना १०० टक्के कर्मचारी कामावर असल्याचे दाखवले गेले आहे. त्यासाठी बनावट देयके आणि कागदपत्रे सादर केली गेली. त्यात महापालिकेकडून ३१ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त केले. त्यामुळेच या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडूनही अन्वेषण करणे आवश्यक आहे’, असे ‘ईडी’कडून सांगण्यात आले आहे.