‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?
१. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्यांना आप्तस्वकियांकडून विरोध होणे; मात्र गुरु आणि ईश्वर यांनी त्यांना सर्वोच्च आनंद देणे
‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे आज ईश्वरप्राप्तीसाठी पूर्णवेळ साधना करणार्या किंवा साधनेसाठी अधिकाधिक वेळ देणार्यांना आप्तस्वकियांकडून विरोध होतो. ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.
२. धर्माचरण आणि साधना करणार्या अन्य पंथियांचे त्यांच्याच पंथबांधवांनी कौतुक करणे, तर हिंदूंनी त्याला विरोध करणे !
अन्य पंथीय त्यांच्या पंथाप्रमाणे आचरण करणार्यांचे कौतुक करतात, तर हिंदु धर्मीय टीका करतात. मुसलमान कुटुंबातील कुणी मुल्ला किंवा मौलवी झाल्यास, ख्रिस्ती कुटुंबातील कुणी फादर किंवा नन झाल्यास किंवा जैन पंथातील कुणी संन्यास किंवा दीक्षा घेतल्यास त्यांचे कुटुंबीय त्याविषयी अभिमानाने इतरांना सांगतात. त्यांचे कौतुक करतात; परंतु ‘हिंदु धर्मियांपैकी कुणी साधना करायला लागल्यास किंवा धर्मकार्यासाठी पूर्णवेळ झाल्यास त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना ‘तो कामातून गेला’, असे वाटते.
३. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर झालेला विरोध
एखाद्या साधकाने किंवा साधिकेने पूर्णवेळ साधना करण्याचा विचार केल्यास त्यांना सर्व स्तरांवरून पुष्कळ विरोध होतो. तसाच विरोध मलाही झाला होता. मित्र- मंडळींनी मला मूर्खात काढले. ‘‘एवढी चांगली नोकरी असतांना नोकरी सोडायची दुर्बुद्धी झाली. ‘बायको आणि मुलीचे पुढे कसे होईल ?’, याचा विचार केला आहे का ? एका मुलीचे (पत्नीचे) आयुष्य वाया घालवले. स्वतःची मुलगी किती लहान आहे आणि घरात कमावता कुणी नाही. स्वतःचे घरही नाही अन् पुरेशी पुंजीही नाही, तर कसे होणार ? पुढे कठीण काळ येईल, तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असेल’’, असे म्हणून मला पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
४. साधनेला परावृत्त करणारे लोक बोलत असलेल्या गोष्टींचा गुरुकृपेने मनावर परिणाम न होणे
सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला साधना करण्यापासून परावृत्त करणार्या कुणालाही ‘साधना म्हणजे काय ?’, हे खर्या अर्थाने ठाऊक नव्हते, तरीही ते ‘साधना केल्याने माझी जीवनात पुष्कळ हानी होईल !’, असे मला सांगत होते; परंतु गुरुकृपेने पूर्णवेळ साधना करण्याचा माझा निश्चय पक्का होता. ‘इतर सांगत असलेल्या कोणत्याच गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला नाही’, ही गुरुदेवांची कृपा होय.
५. पूर्णवेळ साधना करू लागल्यावर मायेतील गोष्टींत न अडकणे आणि साधनेला प्राधान्य देणे
नोव्हेंबर २००३ मध्ये पूर्णवेळ साधना करू लागल्यावर मी घरातील कोणत्याच गोष्टींत अडकलो नाही. घरी पत्नी, लहान मुलगी आणि आई असे तिघे असतांनाही घरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या सनातनच्या ठाणे सेवाकेंद्रात रहायला गेलो. आठवड्यातून एकदा रात्री घरी जाऊन सकाळी न्याहारी करून परत आश्रमात जायचो. मी कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित रहाणे टाळायचो; कारण अशा कार्यक्रमांत उपस्थित राहिल्याने साधनेचा अमूल्य वेळ वाया जातो. याविषयी पत्नी मला नेहमी म्हणायची, ‘‘नातेवाइकांच्या कार्यक्रमांना तरी येत जा. मला लोकांनी तुमच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत.’’ हे मी केवळ ऐकून घ्यायचो आणि प्रत्येक वेळी साधनेलाच प्राधान्य द्यायचो. मी माझी मुलगी वैदेहीच्या दहावी किंवा बारावी या परीक्षांच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत घरी गेलो नव्हतो, तसेच मी सख्ख्या बहिणींच्या दोन्ही मुलांच्या लग्नालाही गेलो नव्हतो.
६. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी कुटुंबियांची पूर्ण काळजी घेणे आणि सर्वांना साधक बनवून त्यांच्या कृपाछत्राखाली आश्रमात आणणे
या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) माझ्या कुटुंबियांची पूर्ण काळजी घेतली. हे मी अनेक प्रसंगांत अनुभवले. पूर्णवेळ साधनेला आरंभ करून मला २० वर्षे झाली आहेत. आज अशी स्थिती आहे की, मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत असतांना तिला साधनेची गोडी लागली आणि ती वर्ष २०१४ मध्ये पूर्णवेळ साधिका झाली. पत्नीला ‘एकटीने घरी वेळ कसा घालवावा ?’, हा प्रश्न असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी तिला घरी असतांना सेवा करण्याची बुद्धी दिली आणि तिने सेवा करण्यास आरंभ केला. गुरुकृपेने तीही वर्ष २०१६ पासून पूर्णवेळ साधिका झाली. प्रश्न राहिला होता आईचा ! आता घरी कुणीच नसल्याने देवाने आईला (श्रीमती प्रभावती गजानन शिंदे [वय ८७ वर्षे] यांना) आश्रमात येण्याविना दुसरा पर्याय ठेवला नाही. तिलाही गुरुदेवांनी आश्रमात आणले. आज तिची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे.
७. सर्व कुटुंबियांनी साधना केल्यामुळे कुटुंबियांची हानी न होता आनंद मिळणे
आज माझे सर्व कुटुंब सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या छत्रछायेखाली मानवी जीवनातील ‘मोक्षप्राप्ती’ हे सर्वोच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी साधना करत आहे. यापेक्षा मोठे भाग्य एखाद्याच्या जीवनात कोणते असू शकते का ? आज आम्ही कुटुंबीय आनंदी आहोत. व्यवहारातील व्यक्तींना दैनंदिन भेडसावणार्या चिंता आणि काळजी यांपासून आम्ही दूर आहोत. यावरून सिद्ध होते, ‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकही उदाहरण नाही.
८. प्रत्येकाला धर्मशिक्षण दिले, तरच त्याला ‘जीवनाचे सार्थक कशात आहे ?’, हे कळून पुढे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष साधला जाणे
साधना करून जीवनाचे सार्थक करणार्यांना समाजातून विरोध होतो. केवढे हे अज्ञान ! यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात त्याप्रमाणे लहानपणापासूनच प्रत्येकाला धर्मशिक्षण दिले, तरच त्याला जीवनातील साधनेचे महत्त्व कळेल आणि तो साधनेला लागेल. यातूनच पुढे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष साधला जाईल.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, पनवेल. (२०.८.२०२३)