सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवात रथामागील टाळपथकात सहभागी होतांना आलेल्या अनुभूती

१. ‘जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीही रथयात्रा निघावी’, असे वाटणे आणि प्रत्यक्षात साधकांना रथ ओढतांना पाहून कृतज्ञता वाटणे 

‘काही मासांपूर्वीपासून मला वाटत होते, ‘जगन्नाथ पुरीची जशी रथयात्रा निघते, तशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीही रथयात्रा निघावी; कारण कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगन्नाथ आहेत. त्यामुळे त्यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य साधकांना मिळावे आणि त्यात सगळ्या साधकांना सहभागी होता यावे.’ माझ्या मनात हा विचार आला आणि निघूनही गेला. त्यानंतर मला गुरुदेवांच्या रथोत्सवामागील टाळपथकात सहभागी होण्याची संधी मिळाली. रथोत्सवाच्या सरावासाठी पटांगणावर रथ आणण्यात आला, तेव्हा तो रथ साधकच ओढत होते. ते पाहून काही मासांपूर्वी माझ्या मनात आलेल्या विचारांचे मला स्मरण झाले आणि पुष्कळ कृतज्ञता दाटून आली.

२. पाय दुखण्याचा त्रास असल्यामुळे रथोत्सवात सहभागी होण्यास नकार देणे 

प्रथम मला रथोत्सवातील ध्वजपथकामध्ये सहभागी होण्याचा निरोप आला. ध्वजपथकात पायांच्या पुष्कळ हालचाली कराव्या लागणार असल्याने आणि मला पाय दुखण्याचा त्रास असल्याने मला ते जमणे कठीण जात होते. त्यामुळे ‘मला ही सेवा जमणार नाही’, असे मी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी रथोत्सवात केवळ चालण्याच्या पथकात येण्यासंदर्भात मला निरोप आल्यावर ‘जाऊन बघूया’, असा विचार करून मी त्यात सहभागी झाले.

३. साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी बनवलेल्या रथाच्या मागे सराव केल्यावर पाय अन् कंबर दुखण्याचा त्रास दूर होणे 

रथामागील चालण्याच्या पथकाचे ३ दिवसांनी टाळपथक केले गेले आणि त्यात ‘चालण्याच्या ऐवजी ठेका घेणे’, हा भाग जोडला गेला. माझे पाय आणि कंबर यांत वेदना होत होत्या; पण परात्पर गुरु डॉ. आठवले ज्या रथात बसणार होते, त्या रथाच्या मागे सराव केल्यावर ‘माझे सगळे दुखणे जणू नाहीसे झाले’, अशी मला अनुभूती आली. नाहीतर ‘ही सेवाही मला जमणार नाही’, असे मी सांगणार होते; पण त्याच दिवशी देवाने मला ही अनुभूती दिली. नंतर मी सगळा भार देवावर सोपवून रथोत्सवात सहभागी झाले.

४. कृतज्ञता 

रथोत्सवासाठी बनवलेल्या रथातील चैतन्याने त्या दिवसापासून अनेक साधकांना रथोत्सव होईपर्यंत दुखणे जाणवले नाही. या सेवेतून आम्हाला ही गुरुकृपाच अनुभवता आली. ‘या दिव्य रथोत्सवासाठी मला सेवेची संधी मिळाली कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’ (१३.५.२०२३)

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, गोवा. (१३.५.२०२३)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक