हिंसक जमावापासून स्वसंरक्षण आणि नागरी संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना
‘भारतात अनेक वेळा जातीय दंगली, हिंसक आंदोलने, हिंदु-मुसलमान दंगली होतात. काही वेळा मोठा जमाव अन्य समाजाच्या घरांवर आक्रमणे करतो, तेव्हा त्याच्यापासून त्या घरातील लोकांना स्वत:चे रक्षण करणे कठीण जाते. हिंसक जमाव मालमत्तेची नासधूस करतो, जाळपोळ करतो आणि तेथील निरपराध लोकांना मारहाण करतो. अशा वेळी स्वतःचे, कुटुंबियांचे, मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस येईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे, ही काळाची आवश्यकता म्हणावी लागेल.
१. हिंसाचारापासून रक्षण होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
अ. सशस्त्र जमावाकडे अनेक प्रकारची शस्त्रे असतात. अशा गुंडांच्या भ्रमणभाषसंचावर लक्ष ठेवता आले, तर त्यांना आधीच पकडता येईल. सामाजिक माध्यमांद्वारे प्रक्षोभक संदेश किंवा चित्रे पाठवली जातात. त्यामुळे जमाव हिंसा करण्यासाठी सिद्ध होतो.
आ. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे वेळोवेळी ‘सिक्युरिटी ऑडिट’ (संरक्षणाच्या दृष्टीने परीक्षण) करणे आवश्यक आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. तसेच घराच्या आत आणि बाहेर ‘सीसीटीव्ही’ बसवू शकतो. त्यामुळे हिंसक जमावाच्या हालचाली मुद्रित करता येतील.
इ. प्रत्येक घर किंवा सोसायटी यांचे रक्षण करण्याची पद्धत ही त्यांच्या रचनेवर अवलंबून असते. त्यामुळे पोलीस किंवा सैन्य अधिकारी यांच्याकडून त्या जागेचे संरक्षण करण्यासंबंधी विश्लेषण करावे आणि त्याच्या कार्यवाहीचे नियोजन सिद्ध करून ठेवावे. त्यासाठी समाजातील तज्ञ व्यक्तींचे साहाय्य घेऊ शकतो. या नियोजनाची माहिती आपल्या भागातील सर्वांना द्यावी.
२. तणावाच्या परिस्थितीत काय करावे ?
अ. अधिक तणाव निर्माण झाला असेल आणि हिंसक आक्रमण होण्याची शक्यता वाढली असेल, तर त्याला विविध पद्धतींनी लांब अंतरावरच घाबरवून थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. जमाव जवळ आलाच, तर त्याला विविध ‘नॉन लिथल वेपन्स’, म्हणजे अल्प धोकादायक शस्त्रांच्या साहाय्याने काही वेळ थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे पोलीस पोचेपर्यंत स्वतःची हानी टळू शकते.
आ. जर तणाव अधिक निर्माण झाला आणि हिंसक आक्रमणाची शक्यता वाढली, तर बायका, मुले, आजारी आणि म्हातारी माणसे, म्हणजे कमकुवत घटकांना घरातून अन्य नातेवाइकांच्या घरी सुरक्षितस्थळी पोचवावे, ज्यामुळे त्यांचे रक्षण होईल आणि घराच्या आत फक्त धडधाकट तरुण माणसांनीच रहावे. ज्यामुळे आक्रमण झाल्यास चांगला प्रतिकार करता येईल. पोलिसांनी ‘ड्रोन्स’चा वापर करून जमावावर लक्ष ठेवावे, यांचे चित्रीकरण करावे. यामुळे नंतर हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
इ. परिसरात तणावाची परिस्थिती असते, त्या वेळी आपल्या भागाचे रक्षण करण्यासाठी एक टेहळणी पथक सिद्ध करावे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक घरामध्ये एक बॅटरीवर चालणारा मेगाफोन असणे आवश्यक आहे. त्याच्या साहाय्याने मोठ्या आवाजात उद्घोषणा किंवा आरडाओरड करून हिंसक जमावाला घाबरवता येईल. यासमवेतच आपल्या गल्लीतील एक-दोन घरांमध्ये पोलीस सायरनचा आवाज करणारे सायरन असावे. ते वाजवल्यामुळे हिंसक जमाव पोलिसांच्या भीतीने हिंसाचार करण्याऐवजी पळून जाईल.
ई. हिंसक जमावाच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करतांना अल्प धोकादायक शस्त्रांचा वापर करावा. त्यात गलोल, पाणी, मिरचीचा (तिखट भुकटी) स्प्रे किंवा बाजारामध्ये मिळत असलेली शस्त्रे यांचे साहाय्य घेऊ शकतो. यांचा वापर लांबून करता आला पाहिजे. त्यामुळे हिंसक जमावाशी समोरासमोर लढाई होणार नाही. केवळ आपल्या संरक्षणासाठी अनुमती असलेल्या शस्त्रांचा वापर करता येईल. कोणतीही कारवाई ही देशाच्या कायद्यात बसणारी असावी.
३. तणावग्रस्त परिस्थितीत पोलिसांचे साहाय्य
हिंसाचाराला प्रारंभ कसा होतो, तर आतापर्यंत असे लक्षात आले आहे की, हिंसक जमाव हळूहळू एकत्र येतो. मग त्यांची संख्या वाढते आणि अचानक हिंसाचाराला प्रारंभ होतो. त्या वेळेस तिथे असलेले पोलीस जनतेचे फारसे रक्षण करू शकत नाहीत; कारण त्यांचे म्हणणे असते की, जमावाची संख्या पुष्कळच अधिक होती. म्हणूनच जर हिंसक जमावापासून रक्षण करायचे असेल, तर हिंसेच्या वेळेला पोलिसांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्याकरता पोलिसांचे ‘शीघ्र कृती दल’ हे तणावग्रस्त भागांमध्ये तैनात केले पाहिजे. तसेच राज्य राखीव पोलीस दल आणि अर्धसैनिक दल यांना त्या भागात लवकरात लवकर पाचारण करावे.
४. हिंसाचारानंतर हानीभरपाई मिळवण्यासाठी काय करावे ?
हिंसाचार होत असतांना ध्वनीमुद्रित केलेल्या चित्रफिती पोलीस ठाण्यामध्ये द्याव्यात. तसेच एक समिती स्थापन करून झालेली हानी हिंसक जमावाकडून मिळण्यासाठी प्रशासनाला भाग पाडावे.
५. अन्य उपाययोजना
अ. घराच्या प्रवेशद्वारासाठी मजबूत, सुरक्षित दरवाजे आणि खिडक्या बसवा. सुरक्षा प्रणाली स्थापित करा. यामध्ये सुरक्षारक्षक, ‘सीसीटीव्ही’ चित्रक आणि सुरक्षा भिंत किंवा तारेचे कुंपण यांचा समावेश असू शकतो. घराच्या आत आणि बाहेर ‘सीसीटीव्ही’ चित्रक बसवावेत, जेणेकरून हिंसक जमावाच्या हालचाली मुद्रित केल्या जाऊ शकतील.
आ. घरात एक मोठा पाण्याचा साठा ठेवा, जो आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. घरात अग्नीशमन यंत्र आणि इतर आवश्यक संसाधने ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केल्यास तिच्यावर लगेच नियंत्रण मिळवता येईल.
ई. घरात एक मोठा बॅटरीचलित रेडिओ ठेवा, जेणेकरून तुम्हाला बातम्या आणि संकटकालीन सूचना मिळू शकतात.
उ. तुमच्या शेजार्यांशी संपर्क साधा आणि हिंसक जमावाच्या आक्रमणाच्या शक्यतेविषयी त्यांच्याशी चर्चा करा. आपल्या समुदायातील इतर लोक वा नातेवाईक यांच्याशी संपर्क साधा. एकमेकांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही संपर्कात राहू शकता. आपापल्या भागामध्ये सुरक्षेकरता ‘व्हॉट्सअॅप’चे ग्रुप सिद्ध करून एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य करता येईल.
ऊ. जर जमाव तुमच्यावर आक्रमण करत असेल, तर स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घातक नसलेली पद्धत वापरू शकता. जर तुम्ही हिंसक जमावाच्या आक्रमणात सापडला, तर तुम्हाला तुमचे स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. असे असले, तरी प्रत्येक घर, गल्ली किंवा प्रभाग यांचे तज्ञांकडून विश्लेषण करून या प्रत्येक भागाचे रक्षण कसे करायचे ? याचे अचूक नियोजन बनवावे, ज्यामुळे कुठल्याही हिंसाचाराला तोंड देण्याकरता आपण सदैव सिद्ध असू.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
वाचकांना सूचनाआपत्कालीन स्थितीत कोणत्या प्रकारची कृती करावी ? आणि स्वतःसह कुटुंबाचे रक्षण कसे करावे ? याविषयी माहिती असलेला हा लेख वाचकांनी संग्रही ठेवावा. |