डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित ‘हरितक्रांती’ !
संपादकीय
कृषीप्रधान भारताच्या कृषी क्षेत्राचा विकास हा नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केल्यानेच होईल, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे!
भारतीय ‘हरितक्रांती’चे जनक कृषी शास्त्रज्ञ, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. मोणकोंबु सांबशिवन् स्वामीनाथन् यांचे २८ सप्टेंबर या दिवशी चेन्नई येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. यामुळे भारत एका चांगल्या कृषीतज्ञाला मुकला. भारतात एक काळ असा होता की, देशाचे अन्नधान्य उत्पन्न अत्यल्प होते आणि त्याला अन्य देशांकडे अक्षरश: अन्नासाठी ‘भीक’ मागावी लागे. बंगालमध्ये वर्ष १९४३ मध्ये भीषण दुष्काळ पडल्यावर तेथील लोक तडफडत मृत्यूमुखी पडले. ही सर्व परिस्थिती तमिळनाडूतील एक तरुण पहात होता. त्यामुळे घरचा वैद्यकीय व्यवसाय असूनही ‘शेतकर्यांसाठी काहीतरी करायचे’, या ध्यासाने त्या तरुणाने कृषी क्षेत्रात योगदान देण्याचे मनाशी ठरवले. कृषी विषयात देश-विदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि भारतात ‘कृषी वैज्ञानिक’ म्हणून कारकीर्दीला प्रारंभ केला.
हरितक्रांतीचे स्वप्न !
डॉ. स्वामीनाथन् यांनी भारतीय तांदूळ, गहू, बटाटा यांच्या नव्या प्रजाती अमेरिकी कृषी शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या साहाय्याने विकसित केल्या. या नव्या प्रजातींविषयी शेतकर्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी डॉ. स्वामीनाथन् स्वत: शेतकर्यांच्या बांधावर गेले. शेतकर्यांना त्यांचे उत्पादन अल्प जागेत वाढवून दाखवले. शेतकर्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, या दृष्टीने स्वामीनाथन् यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. त्यानुसार शेतभूमीत काही प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वेगाने वाढू लागले. परिणामी एकेकाळी इतरांकडून साहाय्य मागणारा देश अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकवणारा झाला. देशाच्या लोकसंख्येच्या वाढीच्या वेगाच्या दृष्टीने अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ६० लाख टन असलेले गव्हाचे उत्पादन वर्ष १९६४ ते १९६६ या काळात १ कोटी ७ लाख टनापर्यंत गेले. त्यामुळे देश अन्नधान्यामध्ये पुष्कळ अंशी स्वयंपूर्ण झाला. भारतीय गहू आणि तांदूळ यांच्या पिकांची उंची अधिक होती, त्यांच्या लोंब्या खाली येत असल्यामुळे उत्पादनात घट होई. ही अडचण ओळखून डॉ. स्वामीनाथन् यांनी पिकांची उंची न्यून करण्यावर भर दिला. हरितक्रांतीमुळे भारतात विशेषत: पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये समृद्धी आली असली, तरी ‘हरितक्रांतीचे परिणाम फार काळ टिकणार नाहीत’, असे भाकीतही त्यांनी तेव्हाच वर्तवले होते. काही वर्षांनी पंजाबसारख्या मुबलक अन्नधान्य पिकणार्या राज्यातील शेतीचा कस न्यून होऊ लागला. शेतीतील धान्य खालल्यावर लोक आजारी पडण्याचे प्रकार चालू झाले. शेतभूमी नापिक होऊ लागली. रासायनिक खतांचे हे दुष्परिणाम लक्षात आल्यावर स्वामीनाथन् यांनी ती वापरणे थांबवले आणि अन्य पर्यायांकडे ते वळले. शेतीतून शेतकर्यांचे उत्पन्न वाढले; मात्र त्यामुळे शेतकर्यांच्या स्थितीत तेवढा फरक आढळला नाही. ही स्थिती पाहिल्यावर डॉ. स्वामीनाथन् यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय आयोगाने शेतकर्यांसाठी अनेक शिफारसी केल्या. त्यामध्ये महत्त्वपूर्ण शिफारस होती ती म्हणजे विविध पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एम्.एस्.पी.) निश्चित करण्याची ! उत्पादन खर्चाच्या ५० टक्क्यांहून अधिक दर देण्याची शिफारस त्यांनी केली आहे. असा दर देणे भारतातील कुठल्याही सरकारला अद्याप शक्य झालेले नाही. असे असले, तरी शेतीमालाला योग्य भाव मिळून शेतकर्याने गाळलेल्या घामाचे त्याला योग्य मूल्य मिळून त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, यावर त्यांचा भर होता. विदर्भात शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी ते सुन्न होत असत. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांच्या आत्महत्यांचे आकडे राज्याबाहेर जाऊ नयेत; म्हणून पुष्कळ सावधगिरी बाळगली होती, तसेच स्वामीनाथन् यांनाही राज्यात येऊ दिले नव्हते; मात्र स्वामीनाथन् सर्व अडथळे पार करून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना भेटले, त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. असा ध्यास असलेला शास्त्रज्ञ विरळाच म्हणावा लागेल.
नैसर्गिक शेतीची आवश्यकता
भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान आहे. ते आणि भूमीचा पोत यांनुसार पिके घेण्यात येतात. शेतीतून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाणे यांचा अधिक वापर करून उत्पन्न अधिक मिळावे, ही शेतकर्याची भावना रास्त आहे. रासायनिक खतांचा वापर एकदम बंद करूनही उपयोग नाही. अन्यथा श्रीलंकेत जशी परिस्थिती उद्भवली त्याप्रमाणे, म्हणजे अन्नधान्याचे उत्पादन एकदम घटून महागाई पुष्कळ वाढली. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे पूर्णपणे वळण्यासाठी टप्पे ठरवून घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीचा विचार करता देशी गायीचे शेण, गोमूत्र या पर्यायांचा विचार करावा लागतो. यामध्ये कृषीतज्ञ ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’चे तंत्रज्ञान लोकप्रिय होत आहे. ते वापरणार्या शेतकर्यांना त्याचा चांगला लाभ होत आहे. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यासह शेतभूमीचा पोतही सुधारत आहे. गोमय, गोमूत्र, गूळ इत्यादींचा समावेश असलेले ‘जिवामृत’ वापरून अनेक शेतकर्यांची नापिक झालेली भूमी पिके घेण्यायोग्य होत आहे. त्यामुळे अनुमाने १० वर्षांचा कालावधी निश्चित करून प्रथम १० टक्के आणि नंतर प्रत्येक वर्षी खते, कीटकनाशके यांचा वापर न्यून करत जाऊन नैसर्गिक घटकांचा उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग करून पाहू शकतो. सर्व घटक नैसर्गिक असल्याने कृत्रिम खते, कीटकनाशके यांमुळे होणारे दुष्परिणाम होणार नाहीत. भारतीय शेतभूमी आणि शेतीतील उत्पन्न अधिकाधिक दर्जेदार होईल. भारताचा इतिहासच लाखो वर्षांचा आहे. एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !