कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि आतंकवाद यांचे मिश्रण !
डॉ. जयशंकर यांनी कॅनडाला सुनावले !
वॉशिंग्टन (अमेरिका) – कॅनडाने आतंकवादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी लोकांना साथ दिली आहे. कॅनडामध्ये अशा लोकांना स्थान मिळाले आहे. अमेरिकी लोक कॅनडाला वेगळ्या दृष्टीने पहातात; पण आमच्यासाठी कॅनडा हा एक असा देश आहे जो भारतविरोधी कारवायांचे केंद्र आहे. भारतात संघटित गुन्हेगारीत सहभागी असणारे लोक कॅनडामध्ये पळून जातात. कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसा आणि आतंकवाद यांचे मिश्रण अत्युच्च सीमेवर आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी कॅनडाला पुन्हा सुनावले. ते सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. ते येथील हडसन इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात बोलत होते.
#WATCH | Washington, DC: On India- Canada row, EAM Dr S Jaishankar says, “…For us, it has certainly been a country where, organized crime from India, mixed with trafficking in people, mixed with secessionism, violence, terrorism. It’s a very toxic combination of issues and… pic.twitter.com/tLGgQ15QdO
— ANI (@ANI) September 29, 2023
कॅनडातील राजकारणामुळे खलिस्तानी आतंकवाद्यांना आश्रय मिळतो !
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, कॅनडाने भारतावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आहेत. कॅनडामध्ये राजकीय लाभामुळे खलिस्तानी आतंकवाद्यांना आश्रय दिला जात आहे. तेथे आतंकवादी आणि हिंसाचारी कारवायांची बाजू घेण्यासाठी चांगले वातावरण आहे. त्यांना कॅनडातील राजकारणामुळे स्वातंत्र्य मिळालेले आहे.
भाषण स्वातंत्र्याचा वापर हिंसाचाराला चिथावणी देणारे असू शकत नाही !
येथे एका पत्रकार परिषदेत डॉ. जयशंकर म्हणाले की, भारत एक लोकशाही देश आहे. आम्हाला अन्यांकडून भाषण स्वातंत्र्य काय असते, हे शिकण्याची आवश्यकता नाही; मात्र आम्ही लोकांना हे सांगू शकतो की, भाषण स्वातंत्र्य हिंसाचाराला चिथावणी देणारे असू शकत नाही. आमच्यासाठी हा स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे.
भारताच्या जागी तुम्ही असता, तर काय केले असते ?
जर अन्य देश भारताच्या जागी असते, त्यांच्या अधिकार्यांना, दूतावासांना आणि नागरिकांना धमक्या मिळाल्या असत्या, त्यांच्या सुरक्षेवर संकट आले असते, तर त्यांनी काय केले असते ? जर तुम्ही माझ्या जागेवर असता, तर तुम्ही काय म्हणाला असता आणि काय केले असते ? जर हे सर्व तुमच्या दूतावासातील अधिकारी आणि नागरिक असते, तर तुमची प्रतिक्रिया काय असती ? असे प्रश्न डॉ. जयशंकर यांनी या वेळी विचारले.