कॅनडा ‘मानवाधिकारा’च्या आडून आतंकवादी आणि खुनी यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो !
|
ढाका (बांगलादेश) – कॅनडा हा खुन्यांचा गड आहे. कॅनडा गुन्हेगारांना शरण देतो. त्यांच्यासाठी कॅनडा एका संरक्षण कवचाप्रमाणे आहे. खुनी तेथे जाऊन ऐशारामात जीवन व्यतित करतात, असा गंभीर आरोप बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमन यांनी केला आहे.
एका इंग्रजी भारतीय वृत्तवाहिनीशी बोलतांना अब्दुल मोमेन पुढे म्हणाले की,
१. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर्रहमानचा खुनी नूर चौधरी कॅनडात गेल्यावर त्याच्या प्रत्यार्पणास कॅनडाने आम्हाला नकार दिला होता. कॅनडा काहीतरी कारण सांगून चौधरी याचे प्रत्यार्पण पुढे ढकलत आहे.
२. तेथील सरकारच्या या भूमिकेमागील मूळ कारण शोधण्यासाठी आम्ही कॅनडाच्या न्यायालयातही याचिका प्रविष्ट केली होती. ‘त्याला कॅनडाचे नागरिकत्व दिले आहे का’, हेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. न्यायालयाने यासंदर्भात निर्णयही दिला; परंतु तेथील सरकार चौधरीविषयी काही सांगत नाही आणि त्याला बांगलादेशकडे सोपवतही नाही.
३. कॅनडा ‘मानवाधिकार’ या संकल्पनेच्या आडून आतंकवादी आणि खुनी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून कॅनडा मानवाधिकारांचा गैरवापर करत आहे.
४. कॅनडा सरकारचा कायदा आहे की, त्याच्या देशातील कोणत्या व्यक्तीला ‘जर तिच्या मूळ देशात पाठवल्यावर तिला मृत्यूदंड दिला जाणार असेल’, तर कॅनडा तिचे प्रत्यार्पण करू शकत नाही. कॅनडाचा तसा कायदा असेल; परंतु त्याची भूमी ही खुन्यांचे संरक्षण कवच बनता कामा नये.
५. शेख मुजीबुर्रहमान रहमान यांचा आणखी एक हत्यारा राशिद चौधरी अमेरिकेत रहात आहे. आम्हाला आशा आहे की, अमेरिका त्याचे प्रत्यार्पण करील. अमेरिकेने याआधी एका खुन्याचे प्रत्यार्पण केले होते.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांचा नागरिक असलेला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केल्यावर श्रीलंकेनेही कॅनडाच्या विरोधात वक्तव्ये केली होती. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी ‘कॅनडा आतंकवाद्यांना त्याच्याकडे सुरक्षित स्थान देतो’, असा आरोप केला होता. तसेच ट्रुडो कोणत्याही पुराव्याखेरीज भारतावर आरोप करत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.
संपादकीय भूमिका
|