सांगली येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा सधन कुटुंबात जन्म झाला. त्यांना त्यांच्या एका नातेवाइकाच्या कृतीमुळे कष्ट करून शिक्षण घ्यावे लागले. नंतर त्यांना शासकीय नोकरीमुळे अनेक ठिकाणी स्थानांतर करावे लागले. त्यांना नोकरीत राजकीय हस्तक्षेप होण्याचा त्रासही सहन करावा लागला. त्यांच्या जीवनात २ मोठी आजारपणे आली. ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यापासून गुरुकृपेमुळे प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकले. त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
‘मायेत डुंबत असतांना घोर प्रारब्धातून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला अलगद बाहेर काढून साधनेत आणले आणि टिकवून ठेवले.
१. जन्म आणि बालपण
१ अ. जन्म : माझा जन्म १ जुलै १९४४ या दिवशी काशिळ, (सातारा) या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला.
१ आ. एकत्र कुटुंबात रहाणे : माझे बाबा (कै. बाळकृष्ण गणेश कुलकर्णी) पूर्वीच्या काळातील मॅट्रीकपर्यंत शिक्षण झालेले गावातील एकमेव सदस्य होते. आमचा गावात ऐसपैस ६० खणी दुमजली वाडा होता. त्याच्या समोर अंगण, आड (विहीर), बाहेर मोठा कट्टा आणि जनावरांसाठी स्वतंत्र गोठा होता. आमची जवळपास १०० एकराहून अधिक शेती होती. बाबांचे २ भाऊ (महादेव कुलकर्णी – मोठे भाऊ, रामकृष्ण कुलकर्णी – लहान भाऊ) आणि त्यांचे कुटुंबीय असे आमचे एकत्रित कुटुंब होते. मोठे काका घरातील सर्व व्यवहार पहात असत. गावात आणि तालुक्यात त्यांना वजन होते.
१ इ. वडिलांना गावात मान असणे : बाबा त्या वेळचे गाव-कामगार अधिकारी म्हणून संगममाहुली (जि. सातारा) येथे घोड्यावरून जात असत. ग्रामस्थ बाबांकडे मराठी आणि इंग्रजी भाषेतून पत्रे लिहिण्यासाठी येत असत.
१ ई. ग्रामीण वातावरणातील आनंदी बालपण : आम्ही मुले ‘आडाचे पाणी काढणे, नदीचे पाणी आणणे, शेजारच्या गावातील गिरणीतून दळण दळून आणणे, शेतातून भाजीपाला आणणे, दूध आणणे’, अशी कामे करत होतो.
आमच्या गावात मराठी सातवीपर्यंत शाळा होती. शाळेतील गुरुजींना धान्य स्वरूपात मूल्य दिले जायचे. आम्ही धान्य, शेंगा दुकानात देऊन तेथून किराणा साहित्य आणत होतो. आम्ही उन्हाळ्यात अधून-मधून शेतावरील घरात रहात होतो. आम्हाला मनसोक्त ऊस, रस आणि गूळ खायला मिळत असे. आम्ही पाली येथील खंडोबाच्या यात्रेला बैलगाडीने जात होतो. आम्ही गावातील यात्रेत नवीन कपडे घालून जात होतो. आम्ही काही वेळा गावात रात्री गस्तीसाठी जात होतो. आम्ही शाळेतील काही मित्रांच्या समवेत वाड्यावर रात्री कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत होतो. आम्ही खेळांच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी आई-वडिलांच्या समवेत जात होतो. अशा प्रकारे आमचे बालपण अत्यंत आनंदात, मोठ्यांचे आज्ञापालन करण्यात, मिळून-मिसळून रहाण्यात आणि एकमेकांना समजून घेण्यात व्यतीत झाले. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे आम्हाला परेच्छेने वागणे, इतरांना समजून घेणे, आज्ञापालन करणे इत्यादी गुण आत्मसात करता आले.
१ उ. घरातील धार्मिक वातावरण : पाल (खंडोबा देवस्थान, कराड) येथील पुजारी घरी धार्मिक विधी करायला येत असत. तेव्हा सर्व गावकर्यांना आमंत्रण असे. बाबा आम्हा लहान मुलांकडून एकत्रितपणे श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र, तसेच अन्य स्तोत्रे म्हणून घेत असत, तसेच आमचा अभ्यासही घेत असत. काही संत आमच्या घरी येत असत. त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.
१ ऊ. घरात माणसांचा राबता असणे : काही मोठ्या राजकीय व्यक्ती आणि अधिकारी यांचे निवास अन् भोजन या निमित्ताने आमच्या वाड्यावर येणे-जाणे होत असे.
१ ए. वडिलांच्या भावाने वडिलांच्या वाटणीची भूमी सरकारी खात्यात वर्ग करणे : नंतर आमचे घर आणि शेती यांच्या वाटण्या झाल्या, तरीही मोठे काकाच (कै. महादेव गणेश कुलकर्णी) सर्व व्यवहार पहात असत. गांधी हत्येच्या वेळी झालेल्या जाळपोळीत जळालेला मोठा वाडा परत बांधण्यासाठी आणि अन्य खर्च भागवण्यासाठी भूमीवर ऋण काढले गेले. मुलांच्या शिक्षणासाठी काही शेती विकावी लागली. काकांनी सरकारी ऋण फेडण्यासाठी माझ्या बाबांच्या वाटणीची सर्वच भूमी सरकार दरबारी वर्ग करण्याचा घाट घातला. बाबांनी नोकरी सोडली होती. आम्ही सर्व जण लहान होतो. आम्हाला काहीच आधार नव्हता.
२. शिक्षण
२ अ. शिक्षणासाठी अनाथ विद्यार्थी आश्रमात रहावे लागल्याने कष्ट करण्याची सवय लागणे : बालपणात आलेल्या अशा कठीण प्रसंगांमुळे ईश्वरानेच माझ्याकडून परिस्थितीचा स्वीकार करण्याची आणि त्यागाची सिद्धता करून घेतली. माझे आजोबा (आईचे वडील कै. रामकृष्ण महादेव जोशी) आणि आजी (आईची आई कै. रखमाबाई जोशी) भिलवडी, जिल्हा सांगली येथे रहात असत. माझे मोठे बंधू आणि मोठी बहीण शिक्षणासाठी काही वर्षे आजोबांकडे राहिले. माझ्या शिक्षणासाठी काही ओळखीच्या व्यक्तींमुळे माझ्या वयाच्या १४ व्या वर्षी माझी आई (कै. राधाबाई बाळकृष्ण कुलकर्णी) एकटी मला घेऊन सांगली येथे आली. तेव्हा मी सातवी इयत्ता उत्तीर्ण झालो होतो. माझ्या पुढील शिक्षणासाठी मी सांगलीतील विष्णुघाट येथील अनाथ विद्यार्थी आश्रम येथे रहात होतो. आई पू. केळकर महाराज यांच्या वाड्यात खोली घेऊन रहात होती. आईचे शिक्षण झाले नसल्याने ती काही ठिकाणी स्वयंपाकाचे काम करत होती. मी मधून मधून आईकडे जात असे. अनाथ विद्यार्थी आश्रमातील ‘प्रतिदिन माधुकरी आणि रविवारी भिक्षा मागणे, काही ठिकाणी पूजा करणे, सणावारी ब्राह्मण म्हणून जेवायला जाणे, अन्य कामे करणे, पहाटे नदीत अंघोळ, दोन्ही वेळा संध्या, स्तोत्रपठण आणि व्यायाम करणे’, अशा वातावरणात माझे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. या कालावधीत गुरुदेवांच्या कृपेनेच माझ्यावर चांगले संस्कार होऊन मला चांगल्या सवयी लागल्या. मला शिस्त आणि कष्ट करण्याची सवय लागली. माधुकरी आणि भिक्षा मागावी लागत असल्यामुळे माझा अभिमान गळून गेला अन् पुढे साधनेत मला त्याचा लाभ झाला.
२ आ. आईने हालअपेष्टा सहन करून मुलांना शिक्षण देणे : अकरावीनंतर पुढे शिक्षणाचा व्यय परवडणार नव्हता. आईने ओळखीच्या अधिकारी व्यक्तींकडे चौकशी करून गारगोटी, जिल्हा कोल्हापूर येथे मौनी विद्यापीठ या केंद्रशासकीय अनुदानित निवासी विद्यापीठात मला पुढील शिक्षणासाठी ठेवले. आईने स्वतः कष्ट करून आमचे कुटुंब सांभाळले. तिने सर्वांना चांगले शिक्षण दिले.
३. विवाह, कौटुंबिक जीवन आणि नोकरी
३ अ. आध्यात्मिक वारसा असलेली पत्नी मिळणे आणि तिने मुलींवर चांगले संस्कार करणे : वर्ष १९७५ मध्ये दानोळी, जिल्हा कोल्हापूर येथील कै. माधवराव गणेश कुलकर्णी यांची मुलगी सुलभा हिच्याशी माझा विवाह झाला. गुरुकृपेनेच मला ग्रामीण आणि सोज्वळ वातावरणात वाढलेली, आध्यात्मिक वारसा असलेली, अतिशय हुशार आणि आधार देणारी पत्नी मिळाली. माझा भाग्योदय चालू झाला. आम्हाला ३ कन्यारत्ने लाभली. तिन्ही मुलींवर लहानपणापासून अभ्यास, विविध स्पर्धा, गायन, गीता पठण आणि आध्यात्मिक या दृष्टीने संस्कार करण्यात पत्नीचा मोठा हातभार लागला. सौ. सुलभा (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) हिची प्रत्येक कृती आदर्श आहे. तिने स्वतःच्या आचरणातून मुलींना शिकवले. तिन्ही मुली सनातन संस्थेशी जोडल्या गेल्या. ही गुरुदेवांचीच कृपा ! सौ. सुलभाच्या अपेक्षेप्रमाणे तिन्ही मुलींचे विवाह होऊन गुरुकृपेनेच जावई साधक म्हणून लाभले.
३ आ. नोकरी
३ आ १. शासकीय नोकरीमुळे अनेक ठिकाणी स्थानांतर होणे आणि विविध त्रास सहन करावे लागणे : जुलै १९६७ ते जून २००२ अशी ३५ वर्षे मला गुरुदेवांच्या कृपेने शासकीय नोकरी व्यवस्थित पूर्ण करता आली. या कालावधीत माझे सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी स्थानांतर झाले. नोकरीत माझा गावपातळीवरील व्यक्ती, पदाधिकारी ते जिल्हा राज्यस्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विधानसभा सदस्य, मंत्रीगण इत्यादी सर्वांशी संबंध येत असे. मी काम करतांना माझ्या मनावर सतत ताण असे. कायद्यान्वये असलेल्या अधिकाराप्रमाणे निर्णय देतांनाही मला ताण असे. अनेक वेळा मतभेदाचे प्रसंग उद़्भवत असत; पण त्याही परिस्थितीत श्री गुरूंच्या कृपेने मला स्थिर रहाता आले. राजकीय हस्तक्षेपामुळे दोन वेळा माझ्यावर मुदतपूर्व स्थानांतर होण्याचे प्रसंग आले. त्या वेळी मला न्यायालयात स्थगितीसाठी लढा द्यावा लागला. त्यात गुरुकृपेने मला यश मिळाले. मी नोकरी करत असलेल्या ठिकाणी आर्थिक उलाढाली करणार्या संस्थांशी संबंध येत असल्याने लोकांना अनेक ठिकाणी पैसे देऊन कामे करून घेण्याची सवय होती. या ठिकाणी काम करतांना मला त्रासही सहन करावा लागला. गुरुदेवांच्या कृपेने मला लोकांची कामे तत्परतेने आणि योग्य प्रकारे करता आली. मी परगावी असतांना एखाद्या व्यक्तीच्या कागदपत्रावर बाहेर असतांनाही स्वाक्षरी करून देत होतो.
३ आ २. नोकरीतील तणावामुळे हृदयविकाराचा त्रास होणे; मात्र गुरुकृपेने समाधानाने सेवानिवृत्त होता येणे : या सर्व दगदगीमुळे आणि कामाच्या ठिकाणी होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे ताण येऊन मला बायपास शस्त्रकर्माला सामोरे जावे लागले. गुरुदेवांच्या कृपेने त्यातूनही मी सुखरूप बाहेर पडलो. मला शेवटपर्यंत नोकरी पूर्ण करता येऊन सन्मानाने सेवानिवृत्त होता आले.
४. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रवचन ऐकणे : प्रारंभी सौ. सुलभा सनातन संस्थेशी जोडली गेली. तिने आग्रह केल्याने मी परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रवचन ऐकण्यासाठी गेलो. तेथे माझी सनातन संस्थेशी ओळख झाली. आमचे सर्व कुटुंब साधनारत आहे.
४ आ. आम्ही जत येथून सांगली येथे आल्यावर सौ. सुलभा घराजवळ होत असलेल्या सत्संगाला जाऊ लागली. मी नोकरी सांभाळून सत्संगाला जाऊ लागलो.
४ इ. केलेल्या विविध सेवा
१. वर्ष १९९७ मध्ये मला संस्था स्तरावरील गुरुपौर्णिमा सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळाली. आमच्या घरी उत्तरदायी साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था होत असे. मी नोकरी करत असल्याने आणि मुली शाळेत जात असल्याने सौ. सुलभा एकटीच सर्व व्यवस्था अत्यंत भावपूर्ण रितीने अन् मनापासून करत असे.
२. नोकरी करतांना झालेल्या ओळखींचा प्रवचनांचे आयोजन करणे, विज्ञापने मिळवणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, अर्पण घेणे इत्यादी सेवांसाठी लाभ करून घेता आला. मी नोकरी सांभाळून सेवेसाठी बाहेरगावी जात असे.
३. मी आरंभी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख लिहिणे आणि लेखांसाठी संदर्भ ग्रंथ मिळवणे, ही सेवा करत होतो.
४. संस्थेचे कार्य आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची ओळख समाजातील व्यक्तींना होण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रत्येक आठवड्यात प्रभातफेरी किंवा सायंफेरी होत असत. त्यांच्या नियोजनाची सेवा गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतली. प्रभात फेरी किंवा सायंफेरी यांत चालतांना माझ्यात चैतन्य, उत्साह आणि वीरवृत्ती जागृत होत असे. आमच्या मुलीही प्रभातफेरी आणि सायंफेरी यात सहभागी होत असत.
५. मी ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, सनातन पंचांग आणि वह्या यांचे वितरण करण्याची सेवा केली.
४ ई. गुरुकृपेमुळे दोन वेळा मोठ्या आजारांतून सुखरूप बाहेर पडणे
४ ई १. ‘बायपास’ शस्त्रकर्म होऊनही गुरुदेवांच्या कृपेने साधना आणि सेवा करू शकणे : मी नोकरी करत असतांनाच वर्ष १९८९ मध्ये मला हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर वर्ष २००० मध्ये माझे ‘बायपास’ शस्त्रकर्म झाले. गुरुदेवांच्याच कृपेनेच मला पुनर्जन्म मिळाला. त्या वेळी आम्ही रुग्णालयातील खोलीत ठेवलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून आधुनिक वैद्यांनी ‘‘आम्ही यांना (डॉक्टरांना) ओळखतो. तुम्हाला घाबरायचे काही कारण नाही’’, असे सांगून धीर दिला. गुरुदेवांनीच माझ्यामध्ये पालट घडवून आणला. मी वर्ष २००२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर माझा मिळेल ती सेवा करण्याचा उत्साह वाढला. मला काही संतांचा सत्संग लाभला. मला सेवा आणि साधना यांतील आनंद मिळू लागला. माझी सेवा करण्याची तळमळ वाढली.
४ ई २. वर्ष २०१७ मध्ये मी कणकवली येथे मुलीच्या घरी असतांना मला अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. त्या वेळी गुरुदेवांनीच मला वाचवले. त्यांच्याच कृपेने मी ‘बोनस’ (वाढीव) आयुष्य जगत आहे.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुदेवांच्या कृपेने माझा व्यष्टी साधना करण्याचा आणि जमेल ती सेवा करण्याचा उत्साह टिकून आहे. त्याबद्दल मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेवांनीच मला कृतज्ञतापर सूत्रे लिहिण्याचा विचार दिला आणि त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतले. ते त्यांच्याच चरणी नम्रपणे समर्पित करत आहे.
‘माझ्याकडून अशीच सेवा घडावी आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी माझी प्रगती होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न व्हावेत’, ही गुरुचरणी प्रार्थना ! श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आपला चरणदास,
श्री. दत्तात्रय बाळकृष्ण कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे, सांगली, महाराष्ट्र. (६.५.२०२३)