छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याचे १ सहस्र ५०० ‘व्हॉल्व्ह’ गळके !
एका ‘व्हॉल्व्ह’मधून १७ सहस्र लिटर पाणी वाया !
छत्रपती संभाजीनगर – शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीवर तब्बल १५ सहस्र लहान-मोठे व्हॉल्व्ह आहेत. यातील १० टक्क्यांहून अधिक म्हणजे अनुमाने दीड सहस्रांहून अधिक व्हॉल्व्हला गळती असून यातून लाखो लिटर पाणी वाया जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांनीच दिली. यानंतर शहरातील व्हॉल्व्हची पहाणी केली असता काही व्हॉल्व्हमधून प्रतिदिन अनुमाने १५ ते १७ सहस्र लिटर पाणी वाया जात असल्याचे ‘डीबी स्टार’च्या अहवालातून समोर आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांवरील बहुतांश व्हॉल्व्ह गंजले आहेत किंवा अन्य काही कारणाने नादुरुस्त झाले आहेत. त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ८ दिवसांनी पाणी मिळण्यामागे हेही एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
एका व्हॉल्व्हमधून ५४ कुटुंबांचे पाणी जाते वाया !
रेल्वेस्थानक रस्त्यावरील पर्यटन विभागाच्या कार्यालयासमोरील व्हॉल्व्हमधून पाण्याची किती गळती होते ? हे मोजले असता १ मिनिटाला १२ लिटर, एका घंट्यांत ७२० लिटर, तर २४ घंट्यांत १७ सहस्र २८० लिटर पाणी वाया जात आहे. ५ सहस्र लिटरचे एक टँकर पाणी १८ कुटुंबांना दिले जाते, त्यानुसार येथे ३ टँकर म्हणजे अनुमाने ५४ ते ६० कुटुंबांना पुरेल इतके पाणी नाल्यात जात आहेे.
महापालिका शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाकाठी ११० कोटी रुपयांचा व्यय करते. यात पाण्यात केमिकल टाकणे, अधिकारी-कर्मचारी वेतन, जलवाहिनी आणि इतर देखभाल-दुरुस्तीपासून ते वितरण करणे आदी व्यय होतो. महापालिकेच्या दाव्यानुसार प्रतिदिन ३ एम्.एल्.डी. पाणी वाया जाते; परंतु होणारी बेसुमार गळती अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
संपादकीय भूमिकासहस्रो लिटर पाणी वाया घालवणारे प्रशासन काय कामाचे ? ‘व्हॉल्व्ह’ गळायला लागेपर्यंत ते का पालटले जात नाहीत ? अशा प्रकारे कामचुकारपणा करणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ! |