गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ परिसरात देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे प्रकरण

श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती

पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) : शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (‘सांकवाळचे प्रवेशद्वार’ म्हणजेच पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केल्याच्या प्रकरणी ‘करणी सेने’चे पदाधिकारी संतोष राजपूत आणि डॉ. कालिदास वायंगणकर यांना मडगाव येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन संमत केला आहे. न्यायालयाने द्वयींना संबंधित प्रकरणाची चलचित्रे सामाजिक माध्यमात प्रसारित करू नयेत, असे सांगितले आहे.

वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी फादर केनीत टेलीस आणि इतर यांच्यावर अजूनही गुन्हा नोंद नाही !

१८ ऑगस्ट २०२३ या दिवशी वारसा स्थळी स्थापन केलेली श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती चोरण्यात आली. त्यानंतर फादर केनीत टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे देण्यात आली. हिंदु धर्मियांच्या भावनांनाही ठेच पोचवण्यात आली. नोव्हेंबर २०१७ पासून फादर लुईन आल्वारीस यांच्या नेतृत्वाखालील या घटनेतील संशयितांनी वारसा स्थळी अनधिकृत प्रवेश करून ‘जेसीबी’च्या साहाय्याने भूमीचे उत्खनन केले आणि पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराचे अवशेष भूमीत गाडले. संबंधित ठिकाणी अनेक ‘क्रॉस’ची उभारणी केली. वारसा स्थळाचा चेहरा पालटण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे; मात्र या प्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही.

सांकवाळ येथील वारसा स्थळावर १२ व्या शतकातील मूर्ती सापडल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वारसा स्थळी मूर्तीची स्थापना करावी ! – भक्तांची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी ऑगस्ट २०२३ या काळात श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रसारमाध्यमाशी बोलतांना म्हणाले, ‘‘जर ही मूर्ती ५०० वर्षे जुनी असल्याचा काहींचा दावा असल्यास त्याचे पुरावे द्यावेत. आम्ही तेथे मूर्तीची स्थापना करू.’’

देवीच्या भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या जुने गोवे येथील ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.


सविस्तर वृत्त वाचा –

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना
https://sanatanprabhat.org/marathi/712337.html