आत्महत्या करू पहाणार्या मुंबईतील तरुणाचे प्राण वाचवले !
इंटरपोल आणि मुंबई पोलीस यांच्या सतर्कतेचा परिणाम !
मुंबई – इंटरपोल (जागतिक स्तरावर काम करणारी पोलिसांची एक संघटना) आणि मुंबई पोलीस यांनी मुंबईतील एका तरुणाचे प्राण वाचवले. २८ वर्षीय तरुण गूगलवर ‘आत्महत्या करण्याची सर्वांत चांगली पद्धत’ शोधत होता. याविषयी इंटरपोलला माहिती मिळाल्यावर त्यांनी मुंबई पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी वेळीच तरुणाच्या घरी पोचत त्याचे प्राण वाचवले.
हा तरुण मूळचा राजस्थानचा असून तो मुंबईमध्ये मालाड पश्चिममध्ये असणार्या मालवणी येथे रहातो. २ वर्षांपूर्वी तरुणाच्या आईला काही कारणाने अटक झाली होती. तेव्हापासून तो आईला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तो गेल्या ६ मासांपासून बेरोजगार आहे. आईची सुटका होत नसल्यामुळे तो आणखी दुःखी आहे. यामुळेच त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला. (आत्महत्येसारखे टोकाचे विचार मनात येऊ नयेत, यासाठी भगवंताची आराधना करायला हवी ! – संपादक) पोलिसांनी या तरुणाचे समुपदेशन करून त्याला त्याच्या नातेवाइकांकडे जाण्यास सांगितले.