पुणे महापालिकेचे कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल !
पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम’ यशस्वी !
पुणे – मागील अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येते, तसेच त्याविषयी प्रशासनाला निवेदनही दिले जाते. या वर्षीही समितीने भाविकांनी शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी पुणे शहरात ओंकारेश्वर घाट, एस्.एम्. जोशी पूल, वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट या ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते नदीच्या घाटावर हातात प्रबोधन करणारे फलक घेऊन थांबले होते. ‘मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण हा अपप्रचार’, ‘अशास्त्रीय ‘मूर्तीदान’ करू नका’, असे कथित पर्यावरणवाद्यांच्या ढोंगीपणावर प्रहार करणारे फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महापालिकेचे कृत्रिम हौद, तसेच मूर्ती संकलन केंद्रांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल दिसून आला.
‘भाविकांना शास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास अनुमती देण्यात यावी’, असे आवाहन या वेळी समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ओंकारेश्वर घाट येथील भाविकांना केले होते. या वेळी ‘समितीचे कार्य स्तुत्य आहे. श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच व्हायला हवे, वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने आनंद मिळतो’, असे अभिप्राय भाविकांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केल्या.
आरंभीला पुरेसे पाणी नसल्यामुळे श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास भाविकांना अडचण आली. त्यानंतर संध्याकाळी मोठा पाऊस पडल्याने, तसेच दुपारी ५ वाजल्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे भाविकांची इच्छा असूनही त्या ठिकाणी कोणतीही सोय नसल्याने भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास अडचण आली.
मंचरजवळील मुळेवाडी (जिल्हा पुणे) येथे वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन !
मंचरजवळील मुळेवाडीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करायला नगरपालिकेने कृत्रिम हौद बनवला होता; परंतु ग्रामस्थांनी एकत्रित येऊन श्री गणेशमूर्ती या नदीमध्ये विसर्जन केल्या. कुणीही त्या हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन केले नाही.
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे गणेशभक्तांची असुविधा !आरंभी पुरेसे पाणी नसल्यामुळे श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास भाविकांना अडचण आली. घाटावर नदीपात्रात जाता येऊ नये; म्हणून बांबू आडवे बांधून रस्ता बंद केला होता. ‘नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जन करू नका’, असे आवाहन करणारे फलक पालिकेने ठिकठिकाणी लावले होते. त्यानंतर दुपारी ४ वाजता अचानक पाऊस आला आणि त्यानंतर घंट्याभरात नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत गेली. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पाणी सोडल्याने ते ओंकारेश्वर घाटावरील बंधार्यावरून वाहू लागले. त्यामुळे भाविकांची वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची इच्छा असूनही त्यांची गैरसोय निर्माण झाली. पर्यायाने त्यांना नाईलाजास्तव कृत्रिम हौदात विसर्जन करावे लागत होते. महापालिकेने विसर्जनासाठी जय्यत सिद्धता केली होती, असे सांगितले होते; परंतु ‘आपत्तीजनक स्थिती’साठीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते. |
एस्.एम्. जोशी पूल येथील घाटावरील दयनीय स्थिती
१. एस्.एम्. जोशी पूल येथील घाटावर नदीपात्रात जाता येऊ नये; म्हणून बांबू आडवे बांधून रस्ता बंद केला होता. बांबू बांधलेले असल्याने भाविकांना मोठ्या मूर्ती वहात्या पाण्याकडे न्यायला कसरत करावी लागत होती; मात्र बांबू बांधलेले असूनही भाविक वहात्या पाण्यात विसर्जन करायला प्राधान्य देत होते.
२. भाविक वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास इच्छुक होते; परंतु घाटाच्या दोन्ही बाजूला सुरक्षाकठडेच नव्हते; परंतु विसर्जन हौदाच्या बाजूला मात्र लाकडी कठडे केले होते.
३. मूर्ती नदीच्या पाण्यात सोडण्यासाठी येथे महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध नव्हते, तसेच दुपारी ५ वाजेपर्यंत नदीपात्रात पाणीही न्यून होते.
४. निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेली ट्रॉली अस्वच्छ होती, कचर्याची घाण ट्रॉलीमध्ये तशीच होती, त्यातच निर्माल्य टाकण्यात येत होते. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळे निर्माल्य हे पवित्र आहे, ते कचरा समजून कचर्याच्या अस्वच्छ ट्रॉलीमध्ये ठेवायला नको, हे लक्षात येत नाही, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
५. विसर्जन हौदातून काढून ठेवलेल्या श्री गणेशमूर्ती बाजूला तशाच पडून होत्या.
६. हौदाच्या बाजूला उभी असलेली मुले भाविकांकडून पैसे घेत होते.
ओंकारेश्वर घाटावरील स्थिती !
१. नदीवरील पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षककठडे यावर्षीही बांधलेले नसल्यामुळे भाविकांना विसर्जन करतांना कोणतीही सुरक्षा नव्हती.
२. ओंकारेश्वर घाट येथे नदीपात्राकडे जाणारा रस्ता पटल ठेवून बंद केल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर ओंकारेश्वर घाट येथील नदीपात्राकडे जाणारा बंद केलेला रस्ता पटल काढून पूर्ववत् चालू करण्यात आला.
३. श्री गणेशमूर्ती ठेवण्यासाठी पटल न ठेवल्याने भाविकांना भूमीवर ठेवूनच बाप्पांची आरती करावी लागत होती. गणेशभक्तांना नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यापूर्वी पूजा आणि आरतीसाठी महापालिकेने केलेली व्यवस्था ही पुष्कळच अल्प होती. त्या ठिकाणी गर्दी झाल्यानेही भाविकांची गैरसोय झाली होती.
४. सकाळपासून पाणी सोडले नसल्याने भाविकांचा प्रतिसाद अल्प होता, असे तेथील नावाड्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|